

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल अशी आमची अपेक्षा होती. पण सत्ताधारी पक्षांना त्यात यश मिळू शकले नाही. काँग्रेसने नकार दिल्यानेच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. पण महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता व नाराजी पहाता आमचा पाचवा उमेदवारही निवडून येईल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
निवडणूक बिनविरोध करण्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली. पण काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. निवडणूक बिनविरोध करण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर होती. पण त्यांनी ते पार पाडली नाही त्यामुळे आता निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
सत्ताधारी पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता राज्यसभा निवडणुकीत दिसून आली. आता ही नाराजी विधानपरिषद निवडणुकीत अधिक प्रमाणात दिसून येईल. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना नाराजी व्यक्त करण्याचे साधन हे विरोधी पक्षच असतो. मविआचे आमदार आपली नाराजी मतदानातून दाखवून देतील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
काँग्रेसचा एक उमेदवार मागे घेण्याचा कोणताही विषय नव्हता. महाविकास आघाडीतही तशी चर्चा नव्हती, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले आहेत आणि आम्ही दोन्ही जिंकू. आमच्याकडे काही मते कमी असली तरी आमच्या दोन्ही जागा निवडून येतील. महाविकास आघाडीतही या निवडणुकीबाबत कोणतेही मतभेद नाहीत, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेकडे दोन जागा निवडून आणण्या एवढे संख्याबळ आहे. त्यानुसार शिवसेना दोन जागा लढून जिंकेल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. तसेच प्रत्येक पक्षाने संख्याबळानुसार आपापला विचार करावा, असेही राऊत यांनी म्हटल्यामुळे राज्यसभेतील पराभवाने शिवसेना नाराज असल्याचे समजते. या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या उमेदवाराला 44 मते दिली. त्यापैकी दोन मते शिवसेनेला संजय पवार यांना मिळतील अशी अपेक्षा होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने आपली अतिरीक्त मते दिली आली तरी त्यांच्याकडे असलेल्या अपक्षांनी दगा दिल्याचा सेनेला राग आहे. त्यामुळे राऊत यांनी आधीच ही निवडणूक आपापल्या बळावर लढावी, अशी प्रतिक्रिया दिली होती.