‘त्या’ रात्रीच्या फोनाफोनीची माहिती आमच्याकडे | पुढारी

‘त्या’ रात्रीच्या फोनाफोनीची माहिती आमच्याकडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात केंद्रीय निवडणूक आयोगाला हाताशी धरुन रात्रीच्या अंधारात येथील भाजपचे नेते काय करत होते, याबाबतची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. केंद्रीय गृहखाते आणि निवडणूक आयोगाला जाणार्‍या फोनबाबतची माहिती आमच्याकडे आहे.

राज्यातील यंत्रणा आमच्याकडे आहे पण ईडी नाही. ईडी आमच्याकडे 48 तासांसाठी दिल्यास विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीससुद्धा आम्हाला मतदान करतील, अशी टीका शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केली. शिवसेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवार यांच्या पराभवाबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, आम्हाला सर्वकाही माहिती आहे. पण आता तो विषय संपलेला आहे. एक विजय झाला आणि एक पराजय झाला म्हणजे, अणुबॉम्ब कोसळला असे होत नाही. पण सर्व काही वाहूनही गेले नाही. राजस्थानात काँग्रेस जिंकली आहे, तर हरियाणात निवडणूक आयोग आणि भाजपच्या हात मिळवणीमुळे अजय माकन यांचा पराभव झाला आहे.

अपक्षांची मते राऊत यांना कशी कळली : किरीट सोमय्यांचा सवाल

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी कोणाला मते दिली हे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना कसे कळले, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. राऊत यांनी या सर्व आमदारांची जाहीरपणे नावे घेऊन आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई
करावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यसभा निवडणुकीतील पराभव शिवसेनेला झोंबला आहे. त्यामुळे ते आता
विधान परिषद निवडणुकीचे निमित्त करून पुन्हा अपक्ष आमदारांना धमकावत आहेत. घोडेबाजार कराल तर पाहून घेऊ, अशा उघड धमक्या देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातील माफिया सरकारच्या अंताची सुरुवात झाली असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत यांनी आमदारांची नावे कशाच्या आधारावर जाहीर केली, त्यांना या आमदारांची यादी कोणी दिली, असे प्रश्‍न सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत.

राज्यसभेसारख्या निवडणुकीत छोटे पक्ष आपला उमेदवार उभे करू शकत नाहीत. त्यामुळे कोणालाही मत देण्याचे
त्यांना स्वातंत्र्य असते. त्यांना त्याचा जाब विचारण्याचा अधिकार राऊत यांनी कोणी दिला? अशा वक्‍तव्यांबद्दल त्यांना आता निवडणूक आयोगासमोरही उभे राहावे लागेल, असा इशाराही सोमय्या यांनी दिला.

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा :  प्रवीण दरेकर

राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्षांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्राच्या अधोगतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर दरेकर पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, तीन-साडेतीन लाख मतदारांचे प्रतिनिधी असणारे आमदार अपक्ष असले तरी ते खर्‍या अर्थाने सक्षम असतात. असे असूनही संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांचा केलेला अपमान राज्यातील जनतेला आवडलेला नाही. त्यामुळे येणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला आणखी धक्के बसणार आहेत.

…तर शिवसेना संपेल : अनिल बोंडे

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपले तोंड बंद केले नाही तर शिवसेना संपेल, असे खुद्द शिवसेनेचेच आमदार म्हणतात. आता तरी राऊत यांनी यापासून काहीतरी शिकावे, असे सांगत भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा
सदस्य अनिल बोंडे यांनी रविवारी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

गद्दारी करायची असती तर कधीच केली असती : भुयार

मला गद्दारी करायची असती तर केव्हाच केली असती. मी संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही, अशा शब्दांत मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी खा. संजय राऊत यांना सुनावले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी
सोबत राहून मी निवडून आलो आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करत आहे. राऊत आणि त्यांचा पक्ष तर विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीसोबत आला. विश्‍वासमताच्या वेळेलाही मी महाविकास आघाडी सरकारला मतदान केले होते, असे त्यांनी सांगितले. मी पहिल्या पसंतीचे मत संजय पवार व
दुसर्‍या पसंतीचे मत संजय राऊत यांना दिले, असेही भुयार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नियोजन चुकले, शिवसेनेचे उमेदवार मला फक्‍त हॉटेलमध्ये भेटले. एक फोनही केला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी ज्या सूचना केल्या, त्याप्रमाणे मतदान केले. हा एकट्या अपक्षावर दाखवलेला नव्हे तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्‍वास आहे, अशा भावना भुयार यांनी व्यक्‍त केल्या.

भुयार यांनी घेतली पवार आणि राऊत यांची भेट

देवेंद्र भुयार यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांच्याबद्दल  नाराजी व्यक्त केली. या भेटीनंतर त्यांनी राऊत यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी विधान परिषदेतही आपण महाविकास आघाडीलाच मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी निधी वाटपावरुनही राऊतांनी भुयारांची समजूत काढली असल्याचे समजते.

Back to top button