माफीच्या साक्षीदाराला माफी मिळेलच असे नाही : अ‍ॅड. निकम | पुढारी

माफीच्या साक्षीदाराला माफी मिळेलच असे नाही : अ‍ॅड. निकम

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : केवळ माफीचा साक्षीदार झाला म्हणजे आरोपीची गुन्ह्यातून सुटका होईल असे नाही. कारण कायद्याला माफीच्या साक्षीदारासोबतच इतर गोष्टींचा विश्‍वसनीय पुरावा लागतो. या पुराव्यांच्या आधारेच न्यायालय त्याच्यावर विेशास ठेवू शकते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले.बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात अ‍ॅड. निकम यांनी आपले मत व्यक्‍त केले.

माफीच्या साक्षीदाराची साक्ष गुन्ह्यातील घटनाक्रमाशी संबंधित आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी जशी साक्षीदाराची आहे तशी ती तपास यंत्रणेचीही आहे. आपल्यावरील गुन्ह्यातून सुटका मिळण्यासाठी माफीचा साक्षीदार होणे हा सहज सोपा मार्ग झाला आहे.

तपास यंत्रणाही याच मार्गाचा अवलंब करताना दिसतात, हे घातक आहे, असे स्पष्ट मतही अ‍ॅड. निकम यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, माफीचा साक्षीदार हा मुळात विेशसनीय नसतो. कारण, इतरांच्या माना पिरगळून तो माफीचा साक्षीदार होत असतो. माफीचा साक्षीदार हा अन्य आरोपींसाठी धोकादायक ठरु शकतो. त्याने दिलेल्या पुराव्यांवर सर्व अवलंबून असते.

सचिन वाझे याने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. त्याला सीबीआय पाठोपाठ विशेष न्यायालयानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता वाझे याचा माफीचा साक्षीदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या गुन्ह्यात वाझे आजही आरोपी आहे. त्यामुळेच माफीचा साक्षीदार होऊनही संबंधित आरोपीला काय फायदा होऊ शकतो? गुन्ह्यातील मुख्य आरोपी देशमुख यांना गुन्ह्यात शिक्षा होईल का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. या प्रश्‍नांवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी याबाबत बोलताना आपली मते मांडली.

कोल्हापूर येथील बाल हत्याकांडामध्ये मी किरण शिंदे याला माफीचा साक्षीदार केले होते. त्याने अंजनाबाई गावीत, रेणुका व सीमा या तिघांच्या विरोधात साक्ष दिली. आणि इतर परिस्थितीदायक सबळ पुरावा होता. परंतु बाल हत्याकांडात किरण शिंदेचा सहभाग कमी होता. म्हणून त्याला माफीचा साक्षीदार करण्यात आले. पण जर, एखाद्या गुन्ह्यात मुख्य गुन्हेगार माफीचा साक्षीदार करण्यात आला तर, ते योग्य ठरत नाही असे स्पष्ट मत अ‍ॅड. निकम यांनी यावेळी व्यक्त केले.

माफीच्या साक्षीदाराने एकदा साक्ष दिली, जी सरकारी पक्षाच्या समाधानाप्रमाणे साक्ष असेल तर, त्याला खटल्यातून पूर्ण माफी मिळून निर्दोष मुक्तता होते. मात्र माफीच्या साक्षीदाराची साक्ष अन्य गुन्ह्यात वापरता येणार नाही, सचिन वाझे याच्यासंदर्भातही हाच नियम लावला जाईल, असे सांगून अ‍ॅड. निकम म्हणाले, माफीच्या साक्षीदाराचा गुन्ह्यामध्ये कमीत कमी रोल असावा.

माफीच्या साक्षीदाराने त्याला माहिती असलेली पूर्ण व खरी हकीकत सांगितली पाहिजे. नाही तर, त्याची माफी रद्द करण्याचा अधिकार सरकारी वकिलाला प्राप्त होतो.

कोणत्या प्रकरणात बनवले गेले माफीचे साक्षीदार?

एखाद्या गुन्ह्याचा तपशील उपलब्ध नसल्यास सदर गुन्ह्यात अटक आरोपींपैकी एकाला माफीचा साक्षीदार बनविण्याची तपास यंत्रणेची पद्धत वर्षानुवर्षे चालत आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांच्यावरील आरोपांसाठी, खुनाच्या खटल्यात आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिला, मुंब्रा येथे राहणारी आणि गुजरातमधील चकमकीत मारली गेलेली इशरत जहाँ खरोखरच अतिरेकी होती का, हे ठरवण्यासाठी तर, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली यालाही माफीचा साक्षीदार बनवले गेले.

सचिन वाझे : 

माफीच्या साक्षीदाराने एकदा साक्ष दिली, जी सरकारी पक्षाच्या समाधानाप्रमाणे साक्ष असेल तर, त्याला खटल्यातून पूर्ण माफी मिळून निर्दोष मुक्तता होते. मात्र माफीच्या साक्षीदाराची साक्ष अन्य गुन्ह्यात वापरता येणार नाही, सचिन वाझे याच्यासंदर्भातही हाच नियम लावला जाईल, असे सांगून अ‍ॅड. निकम म्हणाले, माफीच्या साक्षीदाराचा गुन्ह्यामध्ये कमीत कमी रोल असावा. माफीच्या साक्षीदाराने त्याला माहिती असलेली पूर्ण व खरी हकीकत सांगितली पाहिजे. नाही तर, त्याची माफी रद्द करण्याचा अधिकार सरकारी वकिलाला प्राप्त होतो.

 

Back to top button