राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांना महाराष्ट्र काँग्रेसचा पाठींबा : नाना पटोले | पुढारी

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांना महाराष्ट्र काँग्रेसचा पाठींबा : नाना पटोले

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेच्या निवडणूकीनंतर आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीला वेग आला आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरून मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपती पदासाठी पाठींबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी (दि. १२) सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. महाराष्ट्रातील व्यक्ती जर राष्ट्रपती होत असेल तर आमचा शरद पवार यांना पाठींबा आहे, असे त्यांनी म्हटले.

१८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी रणनीती ठरवण्यासाठी मोदी सरकारच्या विरोधातील पक्ष एकत्र येऊन विचारविनीमय करणार आहेत. यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक १५ जून रोजी दिल्लीत आयोजित केली आहे.

राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. याबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल तर महाराष्ट्र काँग्रेसचा पाठींबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरून पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्यसभेसाठी चूक कुठे झाली हे तपासले पाहिजे. सत्य समोर आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मतदानाचे सत्य लवकरच बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले.

नुपूर शर्मा यांच्या वक्यव्यावरून नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. कुणाच्याही धर्माबाबत अपशब्द काढण्याचा कुणालाही अधिकार नाही. भाजपकडून मात्र नुपूर शर्मांना पाठींबा मिळत असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचलंत का?

Back to top button