पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा पसरत असून यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. दरम्यान राज्य सरकारने राज्यातील जनतेला खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य सचिव प्रदिप व्यास यांनी याबाबत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांना सूचना दिली आहे. बंदिस्त ठिकाणांसह मॉल्स, सिनेमागृह, शाळा कॉलेज, सरकारी आणि खासगी कार्यालये, रेल्वे स्टेशन हॉटेल्स आदी ठिकाणी वावरताना मास्क वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज आरोग्यमंत्री यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात अजून मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आलेली नसून मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य सचिवांनी जिल्ह्याधिका-यांना पाठवलेल्या पत्रकात मस्ट हा शब्द आहे, पण त्याचा अर्थ सक्ती असा नाही. कोरोना रुग्णसंख्येला अटकाव घालता यावा, तसेच नागरिकांनाच्या काळजीसाठी हा शब्द वापरला आहे, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.