समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली! | पुढारी

समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला विनाकारण अटक केल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेले समीर वानखेडे यांची मुंबईतून थेट चैन्नईला बदली करण्यात आली आहे.

आर्यन खानसह सहा जणांना एनसीबीच्या विशेष समितीने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडल्यानंतर वानखेडेंवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे तत्कालीन तपास अधिकारी विश्व विजय सिंह यांच्यासह आशिष रंजन प्रसाद यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

दोघेही संशयास्पद कृतीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर, आरोपांच्या फेर्‍यात अडकलेल्या समीर वानखेडे यांची केंद्रीय सीमा क्षुल्क विभागात बदली करण्यात आली होती. एनसीबीतील कार्यकाळ संपल्याने त्यांना मुतदवाढ न देता ही बदली करण्यात आली होती. आता त्यांना थेट चेन्नईला पाठवण्यात आले आहे. वानखडे यांची डीजीटेक्स पेअर्स सर्विसला बदली करण्यात आली आहे.

या बदलीनंतर समीर वानखेडे यांचे एक ट्वीट चर्चेत आले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून नकारात्मक गोष्टींकडे फारसे लक्ष देत नसल्याचे म्हटले आहे. असे केल्याने तुम्ही प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ शकत नाही. आपण नेहमी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे. यामुळे आपले आपल्या निवडींवर जसे नियंत्रण असते तसे आपणही नियंत्रणात राहतो, असे ते म्हणतात.

Back to top button