आज मुंबई, नवी मुंबईच्या प्रभागांची आरक्षण सोडत | पुढारी

आज मुंबई, नवी मुंबईच्या प्रभागांची आरक्षण सोडत

मुंबई/नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिका (Municipal elections) सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार 31 मे रोजी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. मात्र यावेळी ओबीसी आरक्षण नसल्यामुळे माजी नगरसेवकांना प्रभाग गमवायची भीतीच उरलेली नाही. त्यामुळे महिला प्रभाग झाला तरी, विद्यमान माजी नगरसेवकांना पत्नीला निवडणूक रिंगणात उतरून नगरसेवक पद आपल्यात घरात ठेवता येणार आहे.

मुंबई शहरात प्रभागांची संख्या 9 ने वाढली आहे. त्यामुळे यावेळी 236 प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी आरक्षणाचा समावेश नसल्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी 219 प्रभाग राहणार आहेत. यातील 110 प्रभाग महिला आरक्षणामध्ये जाणार आहेत. अनुसूचित जाती 15, अनुसूचित जमाती 2 प्रभाग आरक्षित राहणार आहेत. यात महिलांसाठी अनुक्रमे आठ व एक प्रभाग आरक्षित राहणार आहे.

खुला प्रवर्ग मध्ये 110 प्रभाग महिला आरक्षणा मध्ये जाणार असले तरी त्याची भीती विद्यमान माजी नगरसेवकाला नाही. आपला प्रभाग महिला आरक्षणात गेला तर, पत्नी किंवा मुलीला निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी नगरसेवकांचे प्रयत्न राहणार आहेत. तशी काही नगरसेवकांनी बांधणी केली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत वाशी विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये मंगळवारी सकाळी 10 वा. महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढली जाणार असल्याची माहिती महापालिका निवडणुक विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरी यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेची सदस्य संख्या आता 122 असून 41 प्रभाग आहेत. त्यापैकी 40 प्रभाग तीन सदस्यीय तर एक दोन सदस्य संख्येचा आहे. (Municipal elections)

नव्या महापालिकेत 21 महिला नगरसेवक दिसतील. अनूसूचित जातीसाठीच्या 11 प्रभागांपैकी 6 प्रभाग महिलांसाठी असतील. अनुसूचित जमातींच्या 2 पैकी 1 प्रभाग महिला राखीव असेल. सर्वसाधारण गटात 14 महिला आरक्षित प्रभाग असतील. यानुसार सोमवारी आरक्षणाची सोडत काढली जाईल.

या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असल्या तरी सर्वच पक्ष 27 टक्के उमेदवार ओबीसी प्रवर्गातून उभे करण्याची शक्यता आहे. मात्र, आरक्षण सोडतीत कोणत्या प्रस्थापितांना धक्का बसतो, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Back to top button