कुणाशीही थेट युती नाही; राज ठाकरे यांचे मनसैनिकांना संकेत | पुढारी

कुणाशीही थेट युती नाही; राज ठाकरे यांचे मनसैनिकांना संकेत

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भाजपा किंवा अन्य राजकीय पक्षाशी थेट मैत्री शक्य नसल्याचे पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन मनसैनिकांना केले आहे.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी आयोजित केलेल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात त्यांनी हा कानमंत्र दिला. केवळ निवडक पदाधिकार्‍यांनाच निमंत्रण देणार्‍या राज ठाकरे यांनी या मेळाव्यापासून माध्यमांना दूर ठेवले होते.

येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यात होणार्‍या 14 महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती अथवा आघाडी कोणाशीही होणार नाही. तसेच स्थानिक पातळीवरही कोणाच्या कुबड्या न घेण्याचे स्पष्ट संकेत देत राज यांनी मनसैनिकांना निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश दिल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका नजरेसमोर ठेवून मशिदीवरील भोंगे आंदोलन पुन्हा तीव्र करणार आहे. राज्यात परवानगी घेतलेल्या भोंग्यांना कायद्यानुसार डेसिबल अन् वेळेची मर्यादा आखून देणारी आचारसंहिता राज्यात लागू झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या आचारसंहितेचे पालन होत नसल्याचे मान्य करत आंदोलन आणखी तीव्र करण्यास मनसैनिकांनी तत्काळ होकार दिला. मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत राज्यभरात जनमानस तयार करणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आयोजित करणे यावर या मेळाव्यात शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

आपला राजकीय शत्रू थेट सत्तेत असल्यामुळे सत्तेच्या बळावर शिवसेना ग्रामीण भागात आपली पाळेमुळे आणखी घट्ट करत आहे. आपल्यालाही आता केवळ शहरातच रुतून न बसता ग्रामीण भागाकडे वळले पाहिजे. त्यासाठी राज्यव्यापी अभियान राबविण्याचा कार्यक्रमदेखील राज ठाकरे यांनी या बैठकीत दिला.

राज ठाकरे वैद्यकीय सुट्टीवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर आठवडाभरात शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही त्यांना विश्रांती आवश्यक आहे. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना ते जाऊ शकणार नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या निवडक पदाधिकार्‍यांशी संवाद साधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम देऊन टाकला.

Back to top button