साई रिसॉर्टची कागदपत्रे ईडीने केली जप्त | पुढारी

साई रिसॉर्टची कागदपत्रे ईडीने केली जप्त

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित मालमत्तांवर गुरुवारी छापेमारी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दापोलीतील त्या वादग्रस्त साई रिसॉर्टशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

ईडीने मुरुड ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज करून मंत्री अनिल परब यांच्या नावे असलेल्या काही कागदपत्रांच्या नकला शुक्रवारी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. यात अ‍ॅसेसमेंट उतारा, आकारणी आदी कागदपत्रे यांचा समावेश आहे.

दापोलीतील साई रिसॉर्टवर दाखल झालेले ईडीचे पथक गुरुवारी तेथेच थांबले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत रिसॉर्टशी संबंधित काही कागदपत्रे सादर केली होती. यात मुरूड ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली आकारणी यासाठी असलेला परब यांचा अर्ज आदी कागदपत्रे होती. या सर्व कागदपत्रांच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतल्या. कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतरच हे पथक मुंबईला परतले.

परबांविरुद्धसोमय्या आता हायकोर्टात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी. तसेच आयकर, प्रवर्तन निदेशालय (ईडी), पर्यावरण मंत्रालय आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे निर्देश द्यावेत, यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनीच ही माहिती दिली.

सोमय्या म्हणाले, परब यांनी सरकारी कागदपत्रांची छेडछाड व राज्य सरकारची फसवणूक करून दापोली येथील मुरुड गावाच्या समुद्रकिनार्‍यावरील जागेवर बिनशेती परवानगी मिळवली. त्याचप्रमाणे शेतजमीन आहे असे सांगत येथे 25 कोटींचा उभा केलेला रिसॉर्ट 4 वर्षांनंतर त्यांचे मित्र सदानंद कदम यांना 1 कोटी 10 लाख रुपयांमध्ये विकला. या जागेवर कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआर झेड) व नाविकास क्षेत्र लागू असताना परब यांनी जागेचे मूळ मालक विभास राजाराम साठे तसेच तत्कालीन उपविभागीय अधिकारी, ग्रामपंचायत व तहसीलदार कार्यालयातील लोकांशी हातमिळवणूक करून तेथे रिसॉर्ट बांधण्याची परवानगी मिळवली.

2 मे 2017 रोजी विभास साठे यांच्याकडून परब यांनी 1 कोटी 10 लाख रुपयांत शेतजमीन विकत घेतली व ताबा घेतला. परंतु त्याचा करार 19 जून 2019 ला शेतजमीन म्हणून केले. परंतु, अवघ्या काही दिवसांत येथे 16,800 स्के. फु. चा रिसॉर्ट आहे व तो विभास साठे यांनी बांधला होता. तो रिसॉर्ट परब यांच्या नावाने करावा, असा अर्ज परब यांनी दिला. तो ग्रामपंचायतने स्वीकारला व रिसॉर्ट परब यांच्या नावाने ग्रामपंचायतने ट्रान्सफर केला. 2019-2020, 2020-2021, 2021-2022 या वर्षांची घरपट्टी, दिवाबत्ती कर, मालमत्ता कर हे सर्व परब व त्यांच्या सहकार्‍यांनी भरले आहेत.

हा घोटाळा बाहेर काढल्यानंतर परब यांनी तडकाफडकी हा रिसॉर्ट आपले मित्र सदानंद कदम यांना शेतजमीन म्हणून केवळ 1 कोटी 10 लाख रुपयांत विकली. तो रिसॉर्ट मार्च 2021 मध्ये श्री. सदानंद कदम यांच्या नावाने ट्रान्सफर झाला.

Back to top button