शासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या 30 जूननंतरच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | पुढारी

शासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या 30 जूननंतरच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या 30 जूनपर्यंत राज्य सरकारी सेवेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्यांना मनाई केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत, असे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक जाहीर झाली असताना बदल्यांवरून आमदारांची नाराजी नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

सध्या मंत्रालयात बदल्यांचा हंगाम सुरु आहे. महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वित्त, ग्रामविकास, गृहनिर्माण, परिवहन, कृषी आदी महत्त्वाच्या खात्यांत मोक्याची जागा मिळविण्यासाठी अधिकार्‍यांची जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यासाठी मंत्र्यांच्या कार्यालयांत लगबग सुरु आहे.

2005 च्या बदली कायद्यानुसार एप्रिल, मे महिन्यात अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या नियतकालिक बदल्या करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकार्‍याला आहेत. 31 मेनंतर बदल्यांचे अधिकार वरिष्ठ पातळीवर जातात. त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी सध्या बदलीच्या प्रक्रियेत गुंतले आहेत.

बदल्यांची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असतानाच मुख्यमंत्र्यांनी स्थगिती आदेश जारी केले. अपवादात्मक परिस्थितीत बदलीचा निर्णय घ्यावा लागणार असेल तर त्याबाबत थेट माझ्याशी बोलावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशात म्हटले आहे. परिणामी, दरवर्षी 31 मे पर्यंत होणार्‍या बदल्या या वर्षी चांगल्याच रखडणार आहेत.

Back to top button