काँग्रेस मधील आमदार ज्येष्ठ मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज | पुढारी

काँग्रेस मधील आमदार ज्येष्ठ मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज

मुंबई ; नरेश कदम : महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस मधील ज्येष्ठ मंत्री हे पक्षाच्या आमदारांची कामे करत नाहीत. सरकारमधील काँग्रेसचे काही मंत्री या ज्येष्ठ मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यांच्या खात्यातील कामेही करत नाहीत. त्यामुळे लवकरच काँग्रेसचे आमदार आपल्या तक्रारी राहुल गांधी यांच्याकडे मांडणार आहेत.

राज्यात जरी शिवसेनेसोबत महाविकास आघाडीचे सरकार काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या आग्रहामुळे स्थापन झाले असले तरी आमच्या मतदारसंघातील कामांना काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री महत्त्व देत नाहीत.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याची गळ पक्षश्रेष्ठींकडे याच ज्येष्ठ मंत्र्यांनी घातली होती.

अन्यथा पक्षाचे आमदार फुटतील, अशी भीती याच ज्येष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना दाखवली होती. पण या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वर्चस्व आहे. काँग्रेसच्या आमदारांच्या कामांना केराची टोपली दाखवली जाते, असा नाराजीचा सूर काँग्रसचे आमदार खासगीत व्यक्त करत आहेत.

एखाद्या अधिकार्‍याच्या बदलीबाबतचे काम काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांना सांगितले तर यात पडू नका, दिल्लीला रसद पुरवावी लागते, असे उत्तर हे मंत्री देतात, असे काँग्रेसचे आमदार सांगतात.आमदारांचे जे दुःख आहे तेच मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या कनिष्ठ मंत्र्यांचे आहे.

आमच्या खात्यात काम करायला आम्हाला वाव नाही. पक्षाचे ज्येष्ठ मंत्री सरकारबाबत बोलू देत नाही. सरकार टिकविणे हे महत्त्वाचे आहे, वाद नकोत, असे बजावतात, असे हे कनिष्ठ मंत्री सांगतात.

सरकारमधील तीन पक्षांत सरकारी महामंडळाचे वाटप झालेले आहे. पण काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यास ज्येष्ठ मंत्र्यांना रस नाही, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. पूर्वी काँग्रेसच्या सरकारमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना महत्त्व दिले जात असे. कार्यकर्त्यांची कामे होत असत. पण आता या विरुद्ध अनुभव आहे, अशी नाराजी कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

भाजपविरोधात पक्षाचे पदाधिकारी बोलतात, पण हे ज्येष्ठ मंत्री मूग गिळून बसतात. आपली भानगड ईडीकडे जायला नको, म्हणून भाजपच्या नेत्यांशी आतून चांगले संबंध ठेवतात, असे काँग्रेसचे आमदार बोलत आहेत.

मंत्र्यांनी आपापसांत मांडवली केल्याचा आरोप

काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती घेतली आहेत. तसेच परस्परांबद्दल दिल्लीत पक्षाच्या हायकमांडकडे तक्रारी करणार्‍या या ज्येष्ठ मंत्र्यांनी आपसात मांडवली केली आहे. त्यामुळे दिल्लीत सरकारच्या कामाबद्दल चांगलेच सांगितले जाते. या ज्येष्ठ मंत्र्यांची कामे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री करतात.

त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यावर काँग्रेसच्या आमदारांच्या कामांसाठी कोणताही दबाव टाकला जात नाही. काँग्रेसच्या आमदारांनी मतदारसंघातील कामांबाबत पत्र दिले तर निधी नाही, असे सांगून टाळले जाते, अशी आपली व्यथा आमदार मांडत आहेत.

Back to top button