

मुंबई/नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांना अधिकार दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबईतील शाळा बंदच राहतील, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जाहीर केले आहे.
गेले एक वर्ष शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसानही झाले आहे. हे शैक्षणिक वर्ष वाया गेले तर विद्यार्थ्याच्या नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. देशात चौथ्या सिरो सर्वेक्षणात 6 ते 17 वयोगटातील मुलांचेही सर्वेक्षण करण्यात आले.
त्यात सहा ते नऊ वयोगटातील 57.2 टक्के मुलांमध्ये अँटिबॉडी विकसित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच राज्यात पालकांची शाळा सुरू करण्याबाबत मते घेतली असता 81 टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची तयारी दाखविली आहे. या बाबी विचारात घेऊन शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये वॉर्ड ऑफिसर, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व शिक्षण अधिकारी सदस्य असतील. ग्रामीण भागात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
ही समिती नगरपालिका नगरपंचायती आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा सुरू करायची की नाही याबाबत निर्णय घेतील. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांचाही समावेश करण्यात आला आहे.
राज्य सरकारने शाळा सुरु करण्यासाठी ते कार्यक्षेत्र कोरोना मुक्त असणे बंधनकारक केले आहे. यामुळे नवी मुंबईतील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू होणार नसल्याची माहिती शिक्षणधिकारी जयदीप पवार यांनी दिली. नवी मुंबईत 8 ते 10 वीचे 64 हजार 562 विद्यार्थी 440 शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
तर 11 वी आणि 12 वीचे सुमारे 25 हजार हुन अधिक विद्यार्थी आहेत. जोपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडेवारी शुन्यवर येत नाही तोपर्यंत शाळा बंद असतील असे शिक्षणधिकारी पवार यांनी स्पष्ट केले.
जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रांत होतील. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असतील. दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवावे लागेल.
संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो शाळेच्याच शहरात किंवा गावात करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.
विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नाही. पूर्णपणे पालकांच्या संमतीवर उपस्थिती अवलंबून असेल, असे राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
जर एखाद्या शाळेत विद्यार्थी कोरोना बाधित आढळला तर ती शाळा तत्काळ बंद करून निर्जंतुकीकरण करावे लागेल व विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवावे लागेल.
शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांचे कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट पाहण्यात येतील. त्यांचे हे रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असेल.