कोण ठरवते, उपवासाला काय चालते? | पुढारी

कोण ठरवते, उपवासाला काय चालते?

ठाणे ; अनुपमा गुंडे : उपवासाला रताळे चालते, पण गाजर चालत नाही. का तर म्हणे ते उलठ्या देठाचे असते. राजगिरा किंवा भगर चालते, पण तांदूळ चालत नाही.

कुणाला कढीपत्ता चालतो, तर कुणी मस्तपैकी कोथिंबीरीची फोडणी साबुदाण्याला शुद्ध तुपात देतो.

बरे हा साबुदाना आला कुठून? तो तर विदेशी. पण उपवासाला चालणार्‍या यादीत त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर. त्याची उलाढालही मोठी.

देवाचे नाव आणि आपले गाव या उक्‍तीप्रमाणे माणसाने उपवासाचा मार्गही पोटातून काढला. त्यातून उपवास नावालाच उरलेले दिसतात.

परिणामी उपवासामुळे तब्येत सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता दर चातुर्मासात निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

श्रावण सुरू झाला की चातुर्मासाचे उपवास सुरू होतात. उपवास म्हणजे उपवास. त्यासाठी खाण्यापिण्याची तयारी कशासाठी? पण, उपवासाला काय चालते आणि काय चालत नाही हे कुठला धर्मग्रंथ ठरवत नाही, तर मार्केट ठरवते.

उपवासाला चालणार्‍या पदार्थांची भलीमोठी यादी लक्ष्मीपूजक बाजारपेठेनेच भक्‍तांच्या हाती ठेवली आणि भक्‍तांच्या खिशाला हात घालत या बाजारपेठेत लक्ष्मीचा संचार सुरू झाला.

बाजारपेठेसाठी उपवासाचे महिने कमाईचे तर भक्‍तांसाठी उदरभरणाचे ठरत आहेत.

त्यातून उपवासाला चालणार्‍या पदार्थांच्या नावाखाली विविध पदार्थांचे आधुनिकीकरण करून उपवासाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याने उपवास उपहासाचा किंवा चेष्टेचा विषय होत चालला आहे.

वास्तविक उपवास म्हणजे लंघन, निराहार किंवा लघु आहार म्हणजे पचायला हलका आहार घेणे, असे उपवासचे अनेक दाखले, त्याचे संदर्भ आयुर्वेदाच्या आणि धर्मशास्त्राच्या ग्रंथांत आढळून येतात.

त्यामुळे उपवासाला फॅशन किंवा डायटिंगची लेबल लावू नका, उपवास हा गांभीर्यांने आणि वैयक्तीक साधनेसाठी करावा,

असे आवाहन आयुर्वेदाचार्य डॉ. परीक्षित शेवडे आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी पुढारीशी बोलताना केले आहे.

आपल्याकडे धर्माशी संबंध जोडली जाणारी प्रत्येक गोष्ट आयुर्वेदाचे अविभाज्य अंग आहे, असे मत वैद्य शेवडे यांनी व्यक्त केले.

आयुर्वेदात हेमाद्री पंडित उर्फ हेमांडपंत यांनी व्रतवैकल्यांवर चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहला.

इष्टमं धर्मं योजते …म्हणजे आरोग्यासाठी हितकारक असलेल्या गोष्टी धर्मांच्या स्वरूपात जोडल्या की मोठ्या प्रमाणावर लोक त्या स्वीकारतात.

मात्र आज आपण उपवासाचे जे पदार्थ खातो, ते पदार्थ भारतीय नाहीत, हे सर्व पदार्थ बाहेरून आले आहेत.

साबुदाणा त्या काळात प्रचलनात नव्हता. केवळ साबुदाणाच नाही तर अन्य पदार्थांना आपल्या धार्मिक बाबींमध्ये स्थान द्यावे, हे आपल्याच संस्कृतीत घडले आहे.

हा केवळ नैतिक प्रश्न नाही तर या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश हा आरोग्याच्या दृष्टीनेही चूक आहे, असे ठाम मत वैद्य शेवडे यांनी मांडले.

हरतालिकेच्या व्रतात पार्वतीने कंदमुळांचे सेवन केल्याचा उल्लेख आहे.

आपल्याकडे येणार्‍या कंदमुळात काही कंदमुळे उपवासाला चालतात,तर काही नाही, असे का? या प्रश्‍नावर वैद्य शेवडे म्हणाले, हरतालिकेच्या व्रताचाही चुकीचा अन्वयार्थ लावण्यात आला आहे.

पार्वतीने हरतालिकेच्या व्रतात वनाच्या सानिध्यात जे उपलब्ध होते, तोच आहार घेतला. आपण मात्र या व्रतासाठी उपवासाच्या पदार्थांतही वैविध्य शोधतो हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे.

उपवासाला अमुक चालते,तमुक पदार्थ चालत नाही, हे आपण उपवासाचे लावलेले अन्वयार्थ आहेत.

उपवासाला रताळे चालते,गाजर किंवा मुळा का नाही, हे अन्वयार्थ आपणच लावले आणि त्याबाबतचे समज – गैरसमज पसरवले.

ते रूढ झाले, त्याच गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या.

या अंगवळणी पडलेल्या गोष्टींचाच काळानुरूप विचार करण्याची गरज शेवडे यांनी बोलून दाखवली.

उपवासाचे पदार्थ धर्मग्रंथांत नाहीत

आपल्या धार्मिक, पौराणिक ग्रंथांमध्ये उपवासाचे दाखले सापडत असले तरी उपवासाला कुठला आहार घ्यावा,

याबाबतचे संदर्भ उपलब्ध नसल्याचे महाराष्ट्रातील नामांकित पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

एकदा जेवून केलेला उपवास – (एकभुक्त), सूर्यास्तानंतर नक्षत्रं दिसू लागली की भोजन करणे – नक्तभोजन तसेच अहोरात्र केलेल्या उपवासाला संपूर्ण उपवास म्हटले जाते.

प्राचीन ग्रंथांत एकादशी, शिवरात्र, जन्माष्टमी, रामनवमी, हरतालिका या उपवासांचे असे उल्लेख आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपवासाला काय आहार घ्यावा, या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख नसला तरी अंजन,गंध,पुष्प, अलंकार, दंतधावन, गात्राभ्यंग, तांबूल (विडा), दिवसा झोप, मैथुन, अक्षक्रीडा, अतिजलपान या गोष्टी वर्ज्य कराव्यात,

असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळून येतो, असे सोमण यांनी सांगितले.

तब्येत पाहून उपवास करा

उपवासाला पचायला हलका आहार घेणे अपेक्षित आहे.

आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच वेळेला तो आहार घ्यावा, ज्यांना शक्य नाही, म्हणजे ज्यांची पित्त प्रकृती आहे,

त्यांनी दोन वेळा आहार घ्यावा आणि गरज पडल्यास तिसर्‍यांदाही उपवासासाठी हलका आहार घ्यावा, परंतु त्यांसाठी स्वतः नियम करावा.

Back to top button