एक व्यक्ती, एक पदाची राज्यात अंमलबजावणी करणार : नाना पटोले | पुढारी

एक व्यक्ती, एक पदाची राज्यात अंमलबजावणी करणार : नाना पटोले

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात येणार असून 1 व 2 जूनला शिर्डी येथे हे शिबीर होईल. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील उदयपूर घोषणापत्रातील एक व्यक्ती, एक पद या मुद्द्यासह इतर सर्व मुद्द्यांची राज्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

टिळक भवन येथे पक्षप्रभारी एच. के. पाटील, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेश काँग्रेस. प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की,या शिबिराला राज्यातील मंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील. राज्यस्तरीय शिबिरानंतर 9 ते 14 जूनदरम्यान जिल्हास्तरीय शिबिरे आयोजित करण्यात येतील. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व जिल्ह्यांत 9 ते 15 ऑगस्टदरम्यान 75 किमीची आझादी गौरव पदयात्रा काढली जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारचा दृष्टिकोन हा केवळ व्यापारी राहिलेला आहे, त्यातून काँग्रेसने उभे केलेले सर्व काही विकून खासगीकरण केले जात आहे. लोकशाही व संविधान व्यवस्था धोक्यात आणलेली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या संविधानावर घाला घातला जात आहे. काँग्रेसच्या विचारधारेलाच संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात आहे.

Back to top button