

गोवंडी; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी त्याचा धोका कायम आहे. मात्र, याचे भान नेत्यांना दिसत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. रविवारी मुंबईच्या शिवाजी नगर, गोवंडी विभागाचे आ. अबू आझमी यांच्या वाढ दिवसानिम्मित रथातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. फटाके फोडून, घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.धक्कादायक म्हणजे अबू आझमी यांनी हातात तलवार घेऊन तिचे प्रदर्शन देखील केले.
शिवाजी नगर सिग्नलपासून ही मिरवणूक संपूर्ण शिवाजी नगर विभाग आणि घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवर फिरत होती. यावेळी मिरवणूक बरोबर पोलीस बंदोबस्तही तैनात होता. या मिरवणुकीत दुचाकीस्वारांनी रस्त्याने प्रचंड धुडगूस घालत, आरडाओरडा करीत वाहतूक कोंडी केली. या संदर्भात आ. आझमी यांना विचारले असता त्यांनी तलावरीबाबत टाळाटाळ करत, आम्ही पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करीत आहोत, अशी सारवासारव केली.
या प्रकरणी रात्री उशिरा शिवाजी नगर पोलिसांनी आमदार आझमी यांच्यासह 18 जण आणि इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188,269, भा.द.वी.सह कलम 11 महाराष्ट्र कोव्हिड उपायोजना 2020 सह कलम 4,25भाहका. सह37(अ)(1),135 मपोका इत्यादी कलमांतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यात आमदार अबु असिम आझमी, फहाद खान उर्फ आझमी, इरफान खान, गैसउददिन शेख, आयशा खान ऊर्फ,अक्तर कुरेशी,मनोज सिंग,सददाम खान ,तौसीफ खान ,जावेद सिद्दिकी,नौशाद खान,वसिम जाफर शेख, अकबर खान , इर्शाद कुरेशी ऊर्फ बबलू लोटस, रईसा सय्यद, शेहजाद ऊर्फ सय्यद, शकील पठाण, रुक्साना सिद्दिकी व इतर अनोळखी इसमांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे अशाप्रकारे कोरोना नियमांचा फज्जा उडवून वाढदिवस मिरवणूक काढणे आमदार आझमी यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडले आहे.