महापूर : महाड, पोलादपूरच्या महापुरात 15 हजार सापांचा मृत्यू

महापूर : महाड, पोलादपूरच्या महापुरात 15 हजार सापांचा मृत्यू
Published on
Updated on

महाड, पोलादपूर तालुक्यांत 21 व 22 जुलै रोजी झालेला महापूर त सुमारे 40 हजार साप बाधित झाले आहेत. त्यातील 15 हजार सापांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुराने बाधित झालेल्या दोन्ही तालुक्यांतील सुमारे 700 चौ.कि.मी. क्षेत्रातील हे साप आहेत.

सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यात एकूण 174 सर्पमित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्पमृत्यूची आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती ज्येष्ठ पक्षी-प्राणी अभ्यासक तथा सिस्केप संस्थेचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी दिली आहे.

प्रेमसागर मेस्त्री हे गेल्या 25 वर्षांपासून पक्षी व प्राणी संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते महाड येथील सिस्केप या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार सापांबरोबर मगरी आणि घोरपडी यांचे देखील अधिवास पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

नुकत्यात झालेल्या महाड महापूर आणि भूस्खलन आपत्तीबाबत मेस्त्री म्हणाले, महाड तालुक्यातील संपूर्ण वाळण आणि रायगड खोर्‍यात भूस्खलनाच्या लहान-मोठ्या किमान 40 घटना घडल्या आहेत. ज्यावेळी भूस्खलन होते, त्यावेळी जमिनीत मोठ्या प्रमाणात कंपने (व्हायब्रेशन्स) निर्माण होतात.

त्यामुळे बिळांतील साप बाहेर पडतात आणि आपला अधिवास सोडून अन्यत्र जाण्याचा प्रयत्न करतात. यामध्येच सापांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होतात. त्याचबरोबर भूस्खलनात कोसळणार्‍या दरडींच्या दगड-मातीच्या ढिगार्‍याखाली सापांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होतात. मात्र ते कुणाच्याही लक्षात येत नाहीत.

नदीच्या किनारी भागात सापांचा वावर हा सुमारे दोन चौरस कि.मी. अंतराच्या क्षेत्रात असतो. नद्यांना पूर येऊन पुराचे पाणी नदीपात्राबाहेर येते. ज्यावेळी नदीचे पाणी किनार्‍याच्या बिळांमध्ये शिरते त्यावेळी हे साप तेथून बाहेर पडतात आणि अल्पावधीत ते आपल्या अधिवासातून बाहेर जातात. आपल्या अधिवासातून अचानक बाहेर पडलेल्या कोणत्याही प्राण्याचे जगणे कठीण असते आणि अनेकदा त्यांचा मृत्यू होतो, असे निरीक्षण मेस्त्री यांनी नोंदविले.

अलिबाग येथील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक तथा सर्पमित्र डॉ. वैभव देशमुख यांनीही आपली निरीक्षणे नोंदविली. मुळात सापांची आजवर कधीही गणना झालेली नसल्याने त्याच बरोबर ती करणेही अडचणीचे असल्याने सापांची संख्या नेमकी किती हे सांगणे अवघड आहे.

मात्र ठिकठिकाणचे निसगर्र्प्रेमी सर्पमित्र यांच्या निरीक्षणांतून उपलब्ध माहिती नुसार रायगड जिल्ह्यात विषारी श्रेणीतील नाग, फुरसे, घोणस आणि मण्यार तर बिनविषारी श्रेणीतील धामण, वाळा, नानेटी, दिवड अशा प्रमुख जातींची सापांची एकूण संख्या सुमारे एक लाखाच्या आसपास असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुळात साप हे बिळात राहात; परंतु ते स्वतः बिळे तयार करू शकत नाहीत. त्यातूनच 'आयत्या बिळात नागोबा' अशी म्हण प्रचलित झाली. उंदीर, घुशी आणि जंगलातील अन्य काही प्राणी बिळे तयार करतात आणि हेच उंदीर व घुशी हे प्राणी सापांचे भक्ष्य असते. अनेकदा सापाच्या भीतीपोटी उंदीर व घुशी आपली बिळे सोडून दूर जातात आणि काही वेळेस साप या उंदीर, घुशींना खातात आणि बिळे रिकामी होतात. मग त्याच बिळांमध्ये साप वास्तव्य करतात, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

महापुराच्या पाण्याच्या प्रवाहाला जेव्हा वेग येतो त्यावेळी साप या पाण्यामध्ये पोहू शकत नाहीत. ते वेगाच्या प्रवाहात वाहून जाताना खडकावर आदळतात आणि त्यांचा मृत्यू होतो; पण त्यातच एखादा मोठा लाकडी ओंडका जर प्रवाहात आला तर हे साप त्याचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यातून त्यांचे वाचण्याचे प्रमाण खूप कमी असते, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.
दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जमिनीवरील सर्व साप हे केवळ गोड्या पाण्यात राहू शकतात, पोहू शकतात.

परंतु ज्यावेळी नद्यांना महापूर येतो, विशेषतः कोकणातील नद्यांना ज्यावेळी महापूर येतो त्यावेळी या नद्यांच्या महापुराचे पाणी खाडीतून पुढे समुद्रास जाऊन मिळते आणि या पाण्यातून वाहत येऊन समुद्रात पोहोचलेले साप हे समुद्राच्या खार्‍या पाण्यात मृत्युमुखी पडतात आणि यामध्ये त्यांच्या मृत्यूची संख्या खूप मोठी असल्याचे आजवरच्या निरीक्षणातून दिसून आल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

सापांच्या जगभरात सुमारे 2,500 जाती असून त्यातील 340 जाती भारतात आढळतात. त्यापैकी केवळ 69 जातींचे साप विषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या सुमारे 52 जाती आहेत. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. नैसर्गिक आपत्तीत साप मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news