मुंबई : ‘एबीसी’ची अंमलबजावणी तातडीने करा | पुढारी

मुंबई : ‘एबीसी’ची अंमलबजावणी तातडीने करा

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम स्वत: ठरवता यावा यासाठी देशातील विद्यापीठात आणि एकूणच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आता ‘अकॅडमिक क्रेडिट बँक’(एबीसी) प्रणाली सुरू केली जाणार आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व शैक्षणिक संस्थांना एबीसीमध्ये तातडीने नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ही नोंदणी झाल्यावर शैक्षणिक वर्ष 2021-22चे गुण तातडीने अपलोड करावेत अशा सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांला त्याचा अभ्यासक्रम स्वत: ठरवून त्याला कोणत्याही महाविद्यालयांतून उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी एबीसीची चाचपणी काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. त्यातील अडचणी समोर न आल्याने आता एबीसीची अंमलबजावणी देशभरात केली जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना एका वेळी अनेक अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. म्हणजे विज्ञान शाखेत शिक्षण घेणार्‍या एखाद्या विद्यार्थ्याला इतिहासाचा अभ्यास करावयाचा झाल्यास, तो पर्याय त्याला या माध्यमातून खुला होणार आहे.

तसेच विद्यार्थ्याला दुसर्‍या शाखेत पाहिजे तो विषय, तो शिकत असलेल्या संस्थेत उपलब्ध नसेल तर तो दुसर्‍या संस्थेत जाऊनही हे शिक्षण घेता येणार आहे. याशिवाय जर विद्यार्थ्याला काही काळ थांबून एखादा वेगळा अभ्यासक्रम किंवा स्टार्टअप असे काही करायचे असेल तर तो नॅशनल अकॅडमिक क्रेडिट बँकमध्ये नोंद करून अभ्यासक्रमातून काही काळ सुट्टी घेऊ शकतो. तसेच जेव्हा तो विद्यार्थी परत अभ्यासक्रम करू इच्छित असेल तेव्हा तो या संकेतस्थळावर पुन्हा लॉगइन करून पुढचा अभ्यासक्रम सुरू करू शकणार आहे.

उच्च शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण एका क्लिकवर उपलब्ध व्हावेत या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने एबीसीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. हे व्यासपीठ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या राष्ट्रीय ई-गर्व्हनन्स विभागाने डिजिलॉकर प्रणाली अंतर्गत विकसित केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक खाते सुरू करता येणार आहे. मात्र यासाठी ते शिक्षण घेत असलेल्या संस्थांची या व्यासपीठावर नोंदणी असणे आवश्यक आहे.

याबाबत आयोगाने 28 जुलै 2021 रोजी राजपत्र प्रसिद्ध केले होते. यानुसार महाविद्यालयांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याला मिळणारा प्रतिसाद अल्प असल्याने आयोगाने आता अखेर इशारा देणारे पत्र काढले आहे. तसेच याच शैक्षणिक वर्षापासूनची माहिती या डिजिलॉकरमध्ये अपलोड करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पत्रातील ठळक मुद्दे

* संस्था, महाविद्यालयांनी संकेतस्थळावर एबीसीची हायपरलिंक ठेवणे बंधनकारक
* एबीसीसाठी समन्वय अधिकार्‍याची नियुक्ती करावी तसेच विद्यार्थ्यांना एबीसी आयडी देऊन त्यामध्ये परीक्षा अर्ज करण्याची सूचना करावी
* संस्थांनी एबीसीमध्ये www.abc.gov.in या साइटवर नोंदणी करावी
* विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष 2021-22 आणि त्यानंतर मिळालेल्या सर्व क्रेडीट्सची माहिती अपलोड करावी
* विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांना एबीसीच्या सुविधांची माहिती करून द्यावी, संकेतस्थळ वापरण्याबाबत सूचना कराव्यात

Back to top button