एक जूनपासून ‘शिवाई’धावणार! | पुढारी

एक जूनपासून ‘शिवाई’धावणार!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्याची जीवनवाहिनीने असणार्‍या एसटीच्या ताफ्यात वर्षभरात 1000 इलेक्ट्रिकल, 2000 सीएनजी आणि 500 साध्या बस येणार आहेत. एसटी महामंडळ 1 जूनला 75 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे औचित्य साधून विजेवरील ‘शिवाई’ बसची पहिली फेरी नगर ते पुणे मार्गावर होईल. याच मार्गावर पहिली एसटी बस धावली होती.

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या, निमआराम, स्वमालकीच्या, भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा 15 हजार 877 बसगाड्या आहेत. त्यापैकी सुमारे 4500 बसगाड्या नादुरुस्त झाल्या असून, गेल्या तीन वर्षांत महामंडळाने एकही नवीन बस खरेदी केलेली नाही. त्यामुळे वर्षभरात साडेतीन हजार नवीन बसगाड्या घेतल्या जाणार आहेत.

500 साध्या, 2000 सीएनजी

लाल रंगाच्या साध्या 500 बसगाड्या आठ वर्षांसाठी भाडेतत्त्वाने घेण्याचा निर्णय 8 ते 10 महिन्यांपूर्वी झाला. त्यापैकी 320 बसगाड्या निविदा प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या कंपनीकडून दोन ते तीन महिन्यांत येण्यास सुरुवात होईल. या बसमध्ये ‘टू बाय टू’ आरामदायी (पुश बॅक) आसनव्यवस्था आणि आकर्षक रंगसंगती असेल. या बसचा चालक कंत्राटदाराचा व वाहक एसटी महामंडळाचा असेल.

सध्या एसटीच्या ताफ्यात बस 12 हजार 828 साध्या बसगाड्या आहेत. या बसगाड्या 11 मीटर लांबीच्या असून, नवीन बसगाड्या 12 मीटर लांबीच्या असतील. त्याचप्रमाणे 2000 नवीन सीएनजी बसगाड्या निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात अशोक लेलँड आणि टाटा या कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. शिवाय जुन्या 1000 डिझेल बसचे रूपांतर सीएनजीमध्ये करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात 150 ‘शिवाई’ बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार असून, वर्षभरात त्यांची 1000 वर नेण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे. निविदा प्रक्रियेद्वारे ई-मूव्हज कंपनीशी 50 व ईव्ही ट्रान्स कंपनीशी 100 बसगाड्यांचा भाडेकरार झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 50 बसगाड्या पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या मार्गांवर; तर 100 बसगाड्या पुणे ते ठाणे, दादर, बोरिवली या मार्गांवर धावतील. एसटी आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येत आहेत. दरम्यान, ‘शिवाई’ बसच्या तिकीट दरांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Back to top button