काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी | पुढारी

काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केला. तर आमची एकला चलो ही आमची भूमिका नव्हती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पटोले यांना लगावला. या आरोप प्रत्यारोपांमुळे आघाडीतील राजकीय मतभेद समोर आले असून त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकपूर्व आघाडीवर होण्याची शक्यता आहे.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडी धर्म विसरून दोन्ही पक्षांनी भाजपच्या सदस्यांना घेऊन सत्ता स्थापन केली. पटोले यांचा जिल्हा असलेल्या भंडार्‍यात काँग्रेसने भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाशी युती करून सत्तेचे समीकरण जुळवले.

तर गोंदियात राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असूनही काँग्रेसला विरोधी बाकांवर बसावे लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पटोले यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा कधीच प्रयत्न नव्हता किंवा एकला चलो ही आमची भूमिका राहिलेली नाही, असा टोला पटोले यांना लगावला.

तिन्ही पक्ष एकत्र रहावेत, हीच आमची भूमिका आहे. प्रफुल्ल पटेल परदेशी असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. गोंदियात कोणत्या परिस्थितीत निर्णय झाला याची माहिती घेण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. राज्यात येणार्‍या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक नेतृत्वाने सर्वांना एकत्र बसवून महाविकास आघाडी एकत्र रहावी असे प्रयत्न करणे अपेक्षित होते. गोंदियामध्ये नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे वेगळे काही झाले असेल तर पक्ष त्याची नोंद घेईल, असेही पाटील म्हणाले.

Back to top button