मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : प्रत्यक्ष स्टेडियममध्ये सामना पाहण्याची अनेकांना हौस असते. मात्र, अशाप्रकारे लाइव्ह सामना पाहणे, अति खर्चिक ठरत आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामामध्ये पाण्याच्या एका ग्लासासाठी चाहत्यांना दहा रुपये मोजावे लागत आहे. शीतपेयांसह (कोल्ड्रिंक) खाद्यपदार्थांसाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.
मुंबईसह पुणे येथे सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेची धूम सुरू असल्यामुळे वानखेडे, ब्रेबॉर्न असो किंवा डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार, कुठलाही क्रिकेट सामना पाहायचा असेल तर प्रेक्षकांसाठी काही नियम आहेत. त्यांना पाण्याची बाटली, नाणी (कॉइन्स) स्टेडियममध्ये सोबत नेण्यास मनाई आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह खाद्यपदार्थ हवे असल्यास तेथील उपलब्ध व्हेंडर्सकडून विकत घ्यावे लागतात.
प्रत्येक स्टेडियममधील व्हेंडर्सकडे प्लास्टिक बाटल्या उपलब्ध असतात. मात्र, तुम्हाला बाटली विकत मिळत नाही. संबंधित विक्रेता 20 रुपयांच्या एक लीटर पाण्याच्या बाटलीची पाच समान ग्लासांमध्ये विभागणी करतो. प्रत्येक ग्लासामागे दहा रुपये म्हणजे तो विक्रेता एका बाटलीमागे 30 रुपये कमिशन मिळवतो.
स्टेडियममधील वरच्या स्टँडवर बसल्यास तुम्ही गृहनिर्माण इमारतीच्या तुलनेत पाचव्या मजल्यावर असता. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तळामध्ये असली तरी इतक्या प्रेक्षकांमधून वाट काढत खाली येत पाणी पिणे शक्य नसते. त्यामुळे उपलब्ध किंमतीत वाढीव दराने पाणी प्यावे लागते. त्यातच्या त्या एका छोट्या ग्लासात तहान भागवणे शक्य नसल्याने एका वेळेसाठी 15 ते 20 रुपयांचा भूर्दंड पडतो.
स्टेडियममध्ये कोल्ड्रिंकचे दरही वाढीव आहेत. 250 मिली शीतपेयांसाठी 50 रुपये मोजावे लागतात. समोसा (110 ग्रॅम) 70 रुपये आहे. व्हेज सँडविच आणि व्हेज बर्गर (110 ग्रॅम) खायचा असल्यास किमान 100 रुपये मोजण्याची तयारी हवी. पॉपकॉर्न (50 ग्रॅम) आणि चिप्ससाठी (60 ग्रॅम) 50 रुपयांचा भुर्दंड पडतो.