राज्य सरकार सूडबुद्धीने वागतेय : नवनीत राणा | पुढारी

राज्य सरकार सूडबुद्धीने वागतेय : नवनीत राणा

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी सोमवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत त्यांच्यासमोर राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेळ मिळाली, तर त्यांच्याकडेही आपण सूडबुद्धीने काम करीत असलेल्या राज्य सरकार व पोलिसांविरोधात तक्रार करणार आहोत, असे खासदार राणा यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबईमध्ये जो काही अन्याय झाला, त्याची सविस्तर माहिती आपण लोकसभा अध्यक्षांना दिली, अध्यक्ष बिर्ला यांनी आपल्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले असल्याचे खा. राणा यांनी नमूद केले. संसदीय समितीच्या बैठकीचे आयोजन करून अधिकृत स्वरूपात म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे अध्यक्षांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केले असल्याचे राणा म्हणाल्या.

आपल्याला कशा पद्धतीने अटक करण्यात आली, तुरुंगात कशी वागणूक देण्यात आली, बनावट आरोप कसे लावले गेले, मुंबईचे पोलिस आयुक्‍त कारस्थानात कसे सामील होते, याची समग्र माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली असल्याचे सांगून राणा म्हणाल्या की, बिर्ला यांनी मला 23 तारखेला भेटण्यास सांगितले असून, त्या दिवशी लेखी तक्रार करण्यास तसेच हक्‍कभंग समितीसमोर म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणात न्याय देण्याची आग्रही मागणी आपण अध्यक्षांकडे केली आहे.

Back to top button