मुंबई : मेल-एक्स्प्रेसच्या जेवणावर प्रवाशांच्या उड्या | पुढारी

मुंबई : मेल-एक्स्प्रेसच्या जेवणावर प्रवाशांच्या उड्या

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम महामंडळाच्या (आयआरसीटीसी) पश्चिम विभागात एप्रिल 2022 मध्ये प्रवाशांनी एकूण 3 लाख 49 हजार 591 जेवणाची पाकिटे बुक केली. एप्रिल 2019 मध्ये 2 लाख 30 हजार 609 जेवणाच्या पाकिटांची विक्री झाली. यावरुन कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच मेल-एक्सप्रेसला होऊ लागलेल्या गर्दीमुळे ट्रेनमध्ये ई-कॅटरिंग सेवेची मागणी वाढल्याचे दिसून येते. नागपूर स्थानकातून सर्वाधिक जेवणाची मागणी आहे.

काही मेल-एक्सप्रेसचा प्रवास हा 24 ते 30 तासांचा असतो. त्यामुळे घरातून सोबत आणलेले अन्नपदार्थ खराब होण्याची शक्यता जास्त असते. तसेच रेल्वे स्थानकातील फूड स्टालवरुन प्रवाशांकडून जादा पैसे आकारले जाऊ शकतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने ई-कॅटरिंग सेवा सुरु केली आहे. कोरोनामुळे मार्च 2020 पासून भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती. कोरोनाचे संक्रमण घटल्याने प्रवासी वाहतूक सुरु केल्यानंतर आयआरसीटीसीने ई-कॅटरिंग देखील सुरु केले.

ई-कॅटरिंगमुळे प्रवाशांना घरातून अन्नपदार्थ घेऊन प्रवास करावा लागत नाही. तसेच ई-कॅटरिंग हा आयआरसीटीसीचा इंटरनेट आधारित उपक्रम आहे. याद्वारे प्रवासी प्रवासादरम्यान मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे रेस्टॉरंट्स आणि फूड आउटलेटमधून त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बुक करू शकतात. त्यानुसार प्रवाशांना त्यांच्या सीट-बर्थवर जेवण पोहोचविण्यात येते. आयआरसीटीसीने विकसित केलेल्या मोबाइल अ‍ॅपवर तसेच ई-कॅटरिंगवर कॅफे आणि रेस्टॉरंटची यादी उपलब्ध आहे. त्यावरुन प्रवासी आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ निवडू शकतात. महत्वाचे म्हणजे यामध्ये मधुमेह असणार्‍या प्रवाशांकरिता खास सकस खाद्यपदार्थांची यादी आहे.

* नागपूर रेल्वे स्थानकातून जेवणाच्या सर्वाधिक 26 हजार 883 डिलिव्हरी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर भोपाळमध्ये 24 हजार 904, इटारसीमध्ये 23 हजार 48 जेवणाची पाकिटे पुरविण्यात आली. याशिवाय सुरत स्टेशनवर 18 हजार 619 जेवणाची पाकीटे प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात आली आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याचा काही भाग आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाअंतर्गत येतो.

  • ज्या प्रवाशांनीत्यांचे तिकीट बुक करताना जेवण बुक केले नाही ते आयआरसीटीसीच्या वेबसाईट  https://www.irctctourism.com/BookFood वर जाऊन ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या चार तास बुकिंग करू शकतात. तसेच रद्दही करू शकतात. पीआरएस काउंटर तिकीट असलेले प्रवासी देखील हीच लिंक वापरून त्यांचे जेवण बुक करू शकतात. प्रवाशांना पोर्टलमध्ये पीएनआर इनपूट करुन व्हेज/नॉन-व्हेज पर्यायासह ऑनलाइन पेमेंट करु शकतात.

Back to top button