मुंबईत २९ ठिकाणी एनआयएची छापेमारी; दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम फ्रूटला घेतलं ताब्यात | पुढारी

मुंबईत २९ ठिकाणी एनआयएची छापेमारी; दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम फ्रूटला घेतलं ताब्यात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मुंबई आणि ठाणे परिसरात 29 ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. एनआयएने टाकलेल्या छाप्यादरम्यान सलीम फ्रूटला त्याच्या मुंबईतील घरातून ताब्यात घेतले आहे. तो दाऊद इब्राहिमचा सहकारी आहे. काही महत्त्वाची कागदपत्रेही त्याच्या घरातून जप्त करण्यात आली आहेत.

एनआयएने फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला दाऊद टोळीशी संबंधित मालमत्तांची खरेदी-विक्री, खंडणी वसुली, तस्करी, हवाला रॅकेट याच्याशी संबंधीत गुन्हा दाखल केला होता. तर, या गुन्ह्यासह ठाणे पोलिसांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाऊद कुटूंबिय आणि टोळीतील काही जणांविरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे.

ईडीने याचसंदर्भातील एका मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यामुळे येत्याकाळात एनआयए सुध्दा अशाप्रकारेच धडक कारवाई करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार एनआयएने मुंबईतील नागपाडा, भेंडीबाझार, माहीम आणि ठाणे, मुंब्रा परिसरात 29 ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे.

Back to top button