नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात इमारतींच्या उंचीवर 55 मीटरची मर्यादा | पुढारी

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात इमारतींच्या उंचीवर 55 मीटरची मर्यादा

नवी मुंबई ; पुढारी डेस्क : मुंबईतील विमानतळ परिसरात 15 ते 20 लाख रहिवासी फनेल झोनची शिक्षा भोगत असतानाच नवी मुंबई विमानतळावरून विमान उडण्यापूर्वीच 20 किलोमीटरच्या परिघात इमारतींच्या उंचीवर 55 मीटरची मर्यादा विमानतळ प्राधिकरणाने घातली आहे. याचा अर्थ नवी मुंबई विमानतळ परिसरात कोणतीही इमारत 12 ते 15 मजल्यांपेक्षा अधिक उंच बांधता येणार नाही.

जानेवारी 2021 पासून या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघात 1500 हून अधिक प्रकल्पांना ना-हरकत प्रमाणपत्रे देण्यात आली. या प्रकल्पांची उंची आता 55 मीटरच्या आत ठेवण्यास सांगितले आहे. यापैकी 10 टक्के प्रकल्पांची उंची ही यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे, असे गृहित धरले तर या उंचीच्या मर्यादेचा थेट फटका किमान 150 प्रकल्पांना बसणार आहे.

एक वर्षापूर्वीपर्यंत विमानतळ पसिरातील इमारतींना उंचीसाठीची प्रमाणपत्रे सिडकोकडून दिली जात होती. या विमानतळाची उभारणी अदानी समूहाकडे गेल्यानंतर ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे अधिकार विमानतळ प्राधिकरणाने सिडकोकडून स्वत:कडे घेतले आणि काही महिने ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे कामच थांबवले. आता जी प्रमाणपत्रे जारी केली जात आहेत त्यात कोणत्याही इमारतीची उंचीची मर्यादा जास्तीत जास्त 55.1 मीटर ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोने 2019 मध्ये 120 ते 130 मीटर उंचीचे अनेक गृहप्रकल्प मंजूर केले. याचा अर्थ या इमारतींची उंची सुमारे 40 मजली असेल. तळोजा, सानपाडा, वाशी आदी सेक्टरमध्ये हे प्रकल्प मंजूर झाले. पण आता नवी मुंबई विमानतळापासून 20 किलोमीटर परिसरात कोणत्याही इमारतीची उंची ही फार फार तर 14 ते 16 मजली असू शकेल.

Back to top button