नवनीत राणा यांच्यासोबत तुरूंगातील वर्तन चुकीचे : रवी राणा | पुढारी

नवनीत राणा यांच्यासोबत तुरूंगातील वर्तन चुकीचे : रवी राणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासोबत तुरूंगात केलेले वर्तन चुकीचे होते. एका महिलेचा केलेला अपमान संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. आम्हाला लक्ष्य करून द्वेषाने कारवाई करण्यात आली. परंतु आम्ही पोलिसांना सहकार्य केले. यापुढेही न्यायालयाच्या आदेशाचे आमच्याकडून पालन केले जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी आज (दि. ६) माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर करताना हे निरीक्षण नोंदवलं आहे. राणा दाम्पत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. पण त्यांच्याकडून राजद्रोहाचा गुन्हा घडला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

राणा दाम्पत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेली वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. पण अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह वक्तव्ये ही भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ अ च्या तरतुदींनुसार देशद्रोहाचा गुन्हा लागू करण्यासाठी कारण ठरू शकत नाहीत. राजकीय नेते शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button