पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात काेणाचीही हुकूमशाही चालणार नाही. येथे कायद्याचे राज्य आहे. तुमचा अल्टिमेटम तुमच्या घरातल्यांना द्या, आम्हाला नको. महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा कुणीही करू नये. सरकार अल्टिमेटमवर नाही चालत, ते कायद्यानेच चालते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टाेला लगावला. भोंग्यांविषयी जो काही निर्णय देण्यात येईल तो सर्व धर्मांना लागू होईल, असेही त्यांनी मुंबई येथे आयाेजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
या वेळी अजित पवार म्हणाले, " राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. सगळ्यांना नियम सारखे आहेत. भोंग्यांसाठी अधिकृत परवानगी घ्यावी. हे आव्हान करूनदेखील कोणी परवानगी घेतली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल'.
नागरिकांनी कोणत्याही भावनिक आवहनाला बळी पडू नये. कायदा हातात घेण्याचं धाडस कोणीही करू नये. न्यायालयाने सांगितलेली आवाजाची मर्यादा पाळा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी राज्य सरकारला ईदच्या सणापर्यंत मुदत देतो. तोपर्यंत राज्यातील सर्व मौलवींशी चर्चा करून मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम दिला. गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून मनसे मागे हटणार नाही. ३ तारखेच्या ईद सणापुर्वी १२ एप्रिल रोजी हा अल्टिमेटम देण्यात आला. राज्य सरकारने १२ एप्रिल ते ३ मे या काळात राज्यभरातील सर्व मौलवींशी चर्चा करावी. त्यानंतर मशिदींवरील भोंगे खाली आले पाहिजेत. असं आवाहन मनसेकडून महाराष्ट्र सरकारला देण्यात आले.
हेही वाचा