

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आता उगवलेल्या नव्या नकली हिंदुत्ववाद्यांची चिंता करू नका. हिंदुत्वावर बोलण्याची त्यांची लायकी नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. राज्यभरात शिवसेना मजबूत करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना त्यांनी दिल्या. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक हिंदुत्ववादी पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना खासदारांची बैठक घेतली होती.
आपले हिंदुत्व असली असल्याचे लोकांना माहीत आहे. शिवसेना अंगार आहे; त्यामुळे भंगार आपल्या वाटेला जाणार नाहीत. गावांची, जनतेची कामे घेऊन या, असे ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना वाढवायची आहे. गटप्रमुख, शाखाप्रमुख यांच्या याद्या मला हव्या आहेत. आता नव्या पिढीला वाव द्या. शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करत आहे. धोका पत्करून शस्त्रक्रिया करून घेतल्यानंतर आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. तुम्ही माझ्यासोबत राहा. बाकी विरोधकांना मी बघतो, असे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले.
यूपीची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ओवैसीला वापरले. आता येथे नवहिंदू ओवैसीच्या माध्यमातून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका शिवसेना खा. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता डोंबिवलीत केली.
हनुमान चालिसाने महागाई संपेल का?
मुंबई : मशिदीसमोर हनुमान चालिसा लावल्याने बेरोजगारी, महागाईसारखे जनतेचे प्रश्न सुटतील का, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मूळ प्रश्नांपासून लक्ष वळवण्यासाठी असे मुद्दे आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अशा घटकांना उत्तर देण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हा एकमेव मार्ग आहेे, असे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त जाती, भटक्या जमाती व मागासवर्गीय सेलतर्फे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलताना सांगितले. डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान व शाहू-फुले यांच्या विचारांमुळेच भारताचा जगात दबदबा निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.