प्रवीण दरेकर म्हणाले, कितीही भ्याड हल्ले करा, सेनेची पोलखोल सुरूच राहणार | पुढारी

प्रवीण दरेकर म्हणाले, कितीही भ्याड हल्ले करा, सेनेची पोलखोल सुरूच राहणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिकेत शिवसेनेची गेले 27 वर्षे सत्ता आहे. या 27 वर्षांच्या कालावधीत नानाविध प्रकारे सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मात्र, भाजपाच्या माध्यमातून राबविलेल्या पोलखोल अभियानामुळे शिवसेना पुरती बिथरली असून भ्याड हल्ले करत आहे. तरी, कितीही भ्याड हल्ले करा, भ्रष्टाचाराची पोलखोल सुरूच राहणार, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

मुंबई शहरात महानगरपालिकेतील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पोलखोल अभियान सुरू केले आहे.या अभियानातील महत्त्वाची सभा चिंतामणी प्लाझा, अशोकवन, दहिसर (पूर्व) येथे झाली. याप्रसंगी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, भारतीय जनता पक्षाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मुंबई प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष, नगरसेवक प्रकाश दरेकर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता गेली 27 वर्षे आहे. महानगरपालिकेचे एका वर्षासाठी 40 हजार कोटी रुपयांचे बजेट असते. याचा अर्थ गेल्या 27 वर्षांमध्ये 8 ते 10 लाख कोटींच्या आसपास रक्कम मुंबईवर खर्च झाली. इतक्या प्रचंड खर्चात एव्हाना मुंबईचे सिंगापूर व्हायला हवे होते; परंतु आजही मुंबईची हालत काय आहे? आजही 2 कोटी लोकसंख्येच्या या मुंबईत 80 लाख मुंबईकरांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही आणि 60 टक्के मुंबईकरांसाठी साधी शौचालये नाहीत. मुंबईतील कष्टकर्‍यांच्या घामाचा पैसा कराच्या माध्यमातून महापालिकेला दिला जातो. हा पैसा कुठे जातो, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.

कोरोनाच्या महामारीत मेलेल्या माणसांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा काम केले, असा घणाघात करून दरेकर म्हणाले, कोविड सेंटर उभारण्याची कामे अनुभव नसलेल्या बांधकाम क्षेत्रातील आपल्याच बगलबच्चांना दिली. कोविडच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींमधून भ्रष्टाचार झाला. प्लास्टिकची चेअर 400 रुपयांना विकत मिळत असताना भाड्याच्या चेअरसाठी 500 रुपये मोजण्यात आले. लाकडी टेबल 1000 रुपयांच्या आसपास मिळतो. परंतु यांनी 4333 रुपये भाडे मोजले. जी गोष्ट विकत घेऊ शकतो त्याच्या चार पटीत भाडे देण्याचे काम केले.

पंखा 3,500 रुपयाला मिळत असतांना प्रत्येक पंख्यासाठी 9 हजार रुपये भाडे मोजले. साठ रुपयांच्या प्लग पॉइंटला 1500 रुपये मोजले. मुंबईतील मराठी माणूस झोपडपट्ट्यांमध्ये राहतो, चाळींमध्ये राहतो यांच्या भविष्याची चिंता मनपा ला नाही. मुंबईत राहायला घर नाही असे 55 टक्के लोक मुंबईत आहेत. याचप्रकारे मोडकळीस आलेल्या घरात राहणार्‍या मुंबईकरांची संख्या 20 ते 25 टक्के आहे. शेकडो एसआरए प्रकल्प बंद आहेत. साडेतीनशे ते साडेचारशे एसआरए प्रकल्प बंद केले, याकडे प्रवीण दरेकर यांनी लक्ष वेधले.

पेंग्विनचे लाड साठ कोटींचे

मुंबईत 8 पेंग्विन पक्षी आणले त्यांच्यावर 60 कोटी रुपये खर्च केले. या पेग्विन चे कंत्राटही पुन्हा जवळच्या कंत्राटदारांनाच दिले . महानगरपालिकेतील सत्ताधार्‍यांना माणसांपेक्षा कंत्राटदार जास्त स्वकीय वाटतात, असा टोला हाणत दरेकर म्हणाले , झोपडपट्टीतील जनतेला आजही शौचालय नाही , पाणी पुरेसे नाही , वीज नाही नागरी सोयी सुविधा नाहीत. असे असताना पेंग्विनचे लाड केले गेले. मिठी नदी मध्ये 12 हजार 500 कोटी रुपये खर्च केले आणि तरीही ती आजही स्वच्छ नाही ही फसवणूक नाही का? असा सवाल दरेकर यांनी केला.

महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करीत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकार मध्ये एक मंत्री असा आहे की, जो म्हणतोय नवाब मलिक का सपना दाऊद का माल अपना, दुसरा मंत्री आसलम शेख ज्यांनी याकुब मेमनच्या फाशीला विरोध केला होता. अशा मंत्र्यांना सरकारच संरक्षण देणार असेल तर अशा वेळी मुंबईकरांचे संरक्षण कोण करणार?

सेनेची पोलखाेल करणारे सवाल

या मुंबईतील 1 कोटी 40 लाख मुंबईकरांसाठी महापालिकेचे पाच वर्षांत 2 लाख कोटी खर्च झाले. मग जागतिक कीर्तीचे डॉक्टर अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू कसा होतो? घाटकोपरची एक महिला चक्कीवर दळण टाकण्यासाठी निघते, तिचा मृत्यू गटारात पडून कसा होतो? वरळीच्या सिलिंडर स्फोटातील कुटुंबाला पालिका रुग्णालयात चार तास उपचार का मिळाले नाहीत? पालिका रुग्णालयात औषधे का मिळत नाहीत? 2 लाख कोटी रुपये मग जातात कुठे? 60 हजार कोटी खर्च केले, मग चोवीस तास पाणी मिळाले का? असे सेनेच्या कारभाराची पोलखोल करणारे सवाल अ‍ॅड. आशिष शेलार यांनी या सभेत उपस्थित केले.

Back to top button