राणा दाम्पत्याच्या जामिनाला पोलिसांकडून जोरदार विरोध, उद्या सुनावणी | पुढारी

राणा दाम्पत्याच्या जामिनाला पोलिसांकडून जोरदार विरोध, उद्या सुनावणी

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याच्या जामिनाला पोलिसांकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. राणा दाम्पत्यांच्या मागील काही गुन्ह्यांची माहिती देत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असल्याचे सांगत त्यांना जामीन देऊ नये असे लेखी उत्तर राज्य सरकारकडून न्यायालयात सादर करण्यात आले आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून वकील आबाद पोंडा बाजू मांडत आहेत. तर प्रदीप घरत सरकारी वकील आहेत. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला पोलिसांनी जोरदार विरोध दर्शवला आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्यांना खार पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची चांगलीच हजेरी घेत फटकारले होते.

दरम्यान, राणा दाम्पत्यावर 124 अ (राजद्रोह) कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर तत्काळ सुनावणीस नकार दिल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली होती. रवी राणा यांना तळोजा कारागृहात आणि नवनीत राणा यांची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली होती.

धार्मिक कारण पुढे करून दोन गटांमध्ये वैमनस्य वाढवणे व एकोप्याला बाधा निर्माण केल्याप्रकरणी उपेंद्र लोकेगावकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध 153 अ, 124 अ, 34 भादंवि सहकलम 37 (1), 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यांत त्यांना त्यांच्या खार येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली होती.

Back to top button