शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचे चौथे समन्स | पुढारी

शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचे चौथे समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार भावना गवळी यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौथ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना ५ मे रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याआधी त्यांना तीन वेळा समन्स बजावण्यात आले होते, मात्र त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नव्हत्या.

खासदार भावना गवळी यांना ईडीचे हे चौथे समन्स बजावले असल्याने त्या यावेळी चौकशीला सामोरं जाणार की, नाही? असा प्रश्न आहे. यावेळी जर त्यांनी चौकशीला जाणे टाळले तर ईडी त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, खासदार भावना गवळी यांचे निकटवर्ती सईद खान याची ३.७५ कोटीची मालमत्ता ईडीने जप्‍त केली होती. खान हा गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान व अन्य संस्थांच्या आर्थिक कारभारावर लक्ष ठेवत होता. काही दिवसापूर्वीच ईडीने त्याला अटकही केली होती.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये ईडीला १७ कोटींचा व्यवहार दिसून आला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ईडीने सईद खान याला ताब्यात घेतले होते. खान हा मूळ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील विद्यमान लोकसभा खासदार गवळी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, परंतु त्यांनी ही या चौकशीला तीन वेळा अनुपस्थिती दर्शवली होती.

हेही वाचा

Back to top button