वधू-वराचा ७००० किलोमीटरचा प्रवास; अन् नंतर बाईकवरून लग्‍नमंडपात झोकात एन्ट्री, पहा व्हिडिओ | पुढारी

वधू-वराचा ७००० किलोमीटरचा प्रवास; अन् नंतर बाईकवरून लग्‍नमंडपात झोकात एन्ट्री, पहा व्हिडिओ

मुंबई; पुढारी वृत्‍तसेवा : नववधू- वराने चक्क ७००० किलोमीटरचा प्रवास करत नंतर बाईकवरून लग्‍नमंडपात झोकात एन्ट्री केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जाणून घेऊया या वधू- वराची गोष्ट. ”मला खरी ओळख मिळाली ती बाईक रायडिंग या माझ्या आवडीमुळे. आई-बाबा, मोठी बहीण आणि मी अशी आमची छोटीशी आणि आनंदी फॅमेली. मला बाईक रायडींगचं तुफान वेड. बाईक रायडिंग हा माझा श्वास, म्हटलं तरी चालेल. आता श्वास चालू ठेवायचं म्हटलं तर आयुष्याचा जोडीदारही तसाच हवा ना? योगायोगानंही घडलंही तसच…, असे बाईक रायडर अंकिता कारेकर सांगतात. आतापर्यंत आपण अनेक लग्नाच्या गोष्टी ऐकल्या असतील, पण हा लग्नसोहळा काहीसा हटके होता. कारण, हा संपूर्ण विवाह सोहळाच बाईकवर आणि बाईकला सोबत घेऊनच पार पडला. कांदिवलीतील ग्रोवेल्स मॉलमध्ये हा विवाह नुकताच संपन्न झाला.

बाईक रायडर अंकिता कारेकर सांगतात की, आमचा लग्नसोहळा २४ एप्रिल २०२२ रोजी नातेवाईक आणि जवळच्या मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत कांदिवली येथील ग्रोवेल्स १०१ मॉलमध्ये उत्साहात पार पडला. लग्न समारंभ पार पडल्यावर ग्रोवेल्स मॉल कांदिवलीहून अंधेरीला जात होतो. यावेळी आम्ही वरात बाईक वरूनच काढायची ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी बाईकवरून प्रवासाला सुरूवात केली त्यावेळी सर्वजण आमच्याकडे आकर्षित होत होते. अनेकांनी तर आमची छबीही कॅमेऱ्यात टिपली. यावेळी रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष त्यांच्याकडे गेल्यावाचून राहत नव्हतं. असं आगळंवेगळं वऱ्हाड पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

बाईक रायडर २०१८ साली आमची एका राईड दरम्यान भेट झाली. आम्ही दोघंही बाईकप्रेमी. बाईक राईड दरम्यान आमची मैत्री झाली. त्यानंतर आम्ही अनेक राईडदरम्यान भेटत गेलो. मैत्री वाढत होती. २०१९ मध्ये मुंबईवरुन स्पिती लेह ते पुन्हा मुंबई असा २४ दिवसांचा प्रवास झाला. एकूण २४ दिवसांच्या या राईडमध्ये मी एकूण ८ राज्यांमधून जवळपास ७००० किलोमीटर बाईक चालवली. माझ्या मित्रांनी बाईक ट्रेनमधून दिल्लीपर्यंत नेण्याचा सल्ला दिला होता. पण, माझा हट्ट होता की, मला पूर्ण राईड बाईकवरूनच करायची आहे आणि मी ती तशीच केली. ही राईड खूप खडतर होती. यात माझ्या मित्राने म्हणजे आताच्या नवऱ्याने खूप चांगली साथ दिली. आम्ही ऐकमेकांची खूप चांगली काळजी घेतली. जर आम्ही आयुष्यभर सोबत राहिलो तर हा प्रवास आणखी भन्नाट होईल याची जाणीव आम्हाला यावेळी झाली. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आमची ओळख बाईकमुळेच झाली, बाईकच्या प्रवासातच आमचं प्रेम बहरलं. आमच्या नात्याला बाईकनेच आकार दिला. म्हणून आता प्रत्येक शुभकार्यात आम्हाला आमच्या बाईकची उपस्थिती महत्त्वाची वाटते. याच कारणामुळे आमचं लग्न दुसऱ्या मजल्यावर असूनही लग्नमंडपात आमच्या बाईक उपस्थित होत्या, असे अंकिता सांगतात.

विशेष म्हणजे वऱ्हाडदेखील बाईक वरुनच विवाहस्थळी पोहचलं. लग्नमंडपात प्रवेश करताना नवरी मुलगी घोड्यावर आलेली आपण पाहिली असेल. पण बाईकप्रेमी अंकिता चक्क बाईकनेच लग्न मंडपात आली. आपण अनेक वेळा नवऱ्या मुलाच्या मागे बसून नवरी मुलगी जाताना बघितलं असेल पण नवऱ्या मुलीला स्वत:च्या वरातीत स्वतःची बाईक चालवताना कोणी बघितलं नसेल. माझ्या प्रत्येक कार्यामध्ये माझी बाईक मला हवी होती आणि म्हणूनच बाईक वरून वरात काढायची कल्पना मला आम्हाला सुचली. जेव्हा आम्ही ही कल्पना आमच्या घरच्यांसमोर मांडली तेव्हा सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला की, नवी नवरी अशी बाईक चालवत कशी येणार? पण तेव्हा आम्ही त्यांना पटवून दिले की जर नवी नवरी नवऱ्याच्या मागे बाईक वर बसून येऊ शकते तर स्वतःच्या बाईक वरून का नाही येऊ शकत, मग हे त्यांना पटले आणि आम्हाला परवनगी देऊन त्यांनी आमच्या या कल्पनेला दुजोरा दिला. कुटुंबाची परवानगी मिळाल्यामुळे समाधान व आनंद वाटल्याचे नववधू अंकिता हिने सांगितले.

आमची वरात कांदिवली ते अंधेरी दरम्यान निघाली. अनेकदा आनंदाच्या भरात आपण नियमांचं उल्लघन करत असल्याचं जाणवत नाही. पण आम्ही सर्व जाणीवपूर्वक वरातीतील सर्व बाईकस्वार यांनी रहदारीचे नियम पाळून कुठेही वाहतुक कोंडी होऊ नये याची प्रथम काळजी घेतली. तसेच वाहतुकीची नियम पाळून सर्वांनी हेल्मेटचा वापर करून सुरक्षिततेची काळजी घेतली. तसेच आम्ही कांदिवलीहून अंधेरीला जात होतो, तेव्हा अनेकांनी तर मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. सामान्यापणे आपल्याकडे नवरी मुलगी लग्न करुन सासरी जाताना नवरदेवासोबतच्या वाहनात किंवा त्याच्या पाठीमागे बसून जाते. पण, आजची मुलगी स्वतंत्र आणि आधुनिक विचारांची आहे, असं मला वाटतं. तिला मागे बसण्यापेक्षा सोबत चालायला जास्त आवडतं. हा संदेश लोकापर्यंत पोहचावा हाच उद्देश या पाठीमागे असल्याचे नववधू अंकिता कारेकर हिने सांगितले.

पहा व्हिडिओ : बुलेटवरून थेट बोहल्यावर….

Back to top button