उद्धव ठाकरे म्हणाले, सोडून दिले म्हणता, हिंदुत्व म्हणजे धोतर आहे काय? | पुढारी

उद्धव ठाकरे म्हणाले, सोडून दिले म्हणता, हिंदुत्व म्हणजे धोतर आहे काय?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आम्ही हिंदुत्व सोडून दिले म्हणता, हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावे आणि सोडावे. बाबरी पाडली त्यावेळी बिळात लपून होतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपवर प्रतिहल्ला चढवला.

राम मंदिर बांधण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतलेला नाही. तो सर्वोच्च न्यायालयाने घेतला, असा टोला हाणत उद्धव म्हणाले, मला घंटाधारी हिंदुत्व नकोय. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे. मी लवकरच जाहीर सभा घेणार आहे आणि मास्क बाजूला ठेवून बोलणार आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचा आहे.

मुंबईकरांचा बेस्ट, रेल्वे व मेट्रोने प्रवास एकाच कार्डवर करता यावा यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएससी कार्ड) जारी करण्यात आलेे. या कार्डाचे लोकार्पण राज्याचे उद्धव ठाकरे यांच्या कुलाब्यातील बेस्ट भवन येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

हनुमान चालीसा व भोंग्यांवरून सुरू असलेल्या राजकारणावर आतपर्यंत गप्प असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपले मौन सोडले. घंटाधारी लोकांनी गदाधारी लोकांना शिकवू नये, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. ज्यांच्या पोटात मळमळत आहे, जळजळत आहे त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे आधी सांगा. आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही.असेही ते म्हणाले.

रामदास स्वामींनी भीमरुपी महारुद्रा असे लिहून ठेवले आहे. ते भीम रूप महारुद्र शिवसेना दाखवून देईल. हनुमान चालीसा म्हणायचा असेल तर या, तुमच्या घरात ती संस्कृती नसेल पण आमच्याकडे त्याला एक पद्धत असते. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा…आमच्या घरी साधू संत येत असतात. पण ते सांगून येतात. आलात तर स्वागत करू, दादागिरी कराल तर, ती मोडून कशी काढायची, हे आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी सांगितले असल्याचा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिला.

आपणही बसमधून प्रवास केला

मेट्रोच्या एका मार्गाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. आता बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन झाले असून या दोन्ही गोष्टी अभिमान वाटाव्या, अशा आहेत. मी मुंबईकर असल्याने येथील परिवहन सेवेतून माझा प्रवास झाला आहे. शाळेत ये-जा करण्यासाठी आपण बसमधून प्रवास केला आहे. मात्र आता काळ बदलला असून आता बसच्या प्रवासात अनेक बदल झाले आहेत. आयुष्याच्या प्रवासात कितीही थांबे आले तरी, पुढेच राहायचे असे उद्गारही मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढले.

Back to top button