नारायण राणे यांच्या बंगल्यावर पुढील आठवड्यात हातोडा? | पुढारी

नारायण राणे यांच्या बंगल्यावर पुढील आठवड्यात हातोडा?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्यासंदर्भात महापालिकेने बजावलेल्या नोटिसीला पुढील आठवड्यात 15 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे पालिकेच्या पश्चिम विभागाने कारवाई करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले आहे.

पुढील आठवड्यात बंगल्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. राणे यांच्या अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासाठी गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेकडून नोटीस बजावण्यात येत आहे. पालिकेने अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी राणे यांना दोन वेळा प्रत्येकी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यानच्या काळात अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासंदर्भात नारायण राणे यांनी पालिकेकडे अर्ज केला होता. त्यानुसार पालिकेने कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र सीआरझेड 2 मध्ये अंतर्गत केलेल्या बांधकामाबद्दल कोणतीही माहिती पालिकेला सादर केली नाही. कागदपत्रांमध्ये वाढीव बांधकामाचा उल्लेख नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे कारवाई अटळ असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button