महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत सापडलेली 85 संरक्षित भारतीय कासवे उत्तर प्रदेशात | पुढारी

महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत सापडलेली 85 संरक्षित भारतीय कासवे उत्तर प्रदेशात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील विविध भागात सापडलेल्या आणि तस्करांच्या तावडीतून सोडवण्यात आलेल्या 85 कासवांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. ही कासवे दुर्मीळ असून ती उत्तर प्रदेशातील असल्याने या कासवांना उत्तर प्रदेशमध्ये नेण्यात आले असून त्यांना घरियाल रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील 15 दिवसांत कासवांची सुटका केली जाईल. यापूर्वी रॉ या प्राणिमित्र संघटनेनेदेखील 2012 मध्ये 450 कासवे अशाच प्रकारे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडली होती.

85 कासवांमध्ये ब्लॅक स्पॉटेड पॉन्ड टर्टल,इंडियन रूफ टर्टल , ट्रायकेरिनेट हिल टर्टल , इंडियन टेंट टर्टल यांचा समावेश आहे. या दुर्मीळ प्रजाती मानल्या जातात.त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या अनुसूची 1 अंतर्गत सर्व प्रजाती संरक्षित आहेत. या कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत आणण्यापूर्वी त्यांना अलग ठेवणे, पुनर्वसन आणि स्थिर करणे आवश्यक होते.रेस्क्यू सीटी पुणे टीमने कासवांना घेऊन सुरक्षित प्रवास करून त्यांना लखनऊमधील घरियाल रेस्क्यू सेंटर येथे पोहोचवले. पुढील दोन आठवड्यात टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स, इंडिया आणि यूपी वन विभागाचे अधिकारी या कासवांना अनुकूल वातावरणात सोडणार आहेत.

या कासवांची महाराष्ट्र वनविभागासह ठाणे, पुणे आणि नाशिक येथील विविध संस्थानी सुटका केली. 2021 मध्ये, राज्यव्यापी मोहिमेत, या कासवांना रेस्क्यू सिटी, वन्यजीव टीटीसी, पुणे येथील रेप्टाइल ट्रान्झिट युनिटमध्ये गोळा करण्यात आले. त्यांना वेगळे ठेऊन त्यांच्या संसर्गाची तपासणी करण्यात आली.

त्यांच्या आहारावर लक्ष दिले गेले. ते वेगवेगळ्या प्रकारच्या हवामान परिस्थितीचा सामना करू शकतील यासाठी त्यांना तयार केले गेले. घरियाल पुनर्वसन केंद्र येथील डॉ. शैलेंद्र सिंग आणि अरुणिमा सिंग यांच्या नेतृत्वाखालील कासव सर्व्हायव्हल अलायन्स टीम उत्तर प्रदेश वन विभागासह त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत आणण्याची प्रक्रिया सक्षम करत आहे.

संरक्षित भागात सुयोग्य अधिवास शोधणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या काही वर्षांतील आमच्या निरीक्षणानुसार सुमारे 60% कासवे जंगलात जगतात असे टॉरटॉइझ सर्व्हायव्हलचे संचालक डॉ. शैलेंद्र सिंग यांनी सांगितले.

Back to top button