मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांकडून गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांतून मालमत्ता खरेदी केली आहे. हा हर्षद मेहता प्रकरणासारखाच मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गिरगाव न्यायालयात न्या. एन.ए.पटेल यांच्यासमोर केला. हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल रेफरन्स म्हणून त्यांनी न्यायालयात वाचून दाखवला.
या घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्यांना पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी अॅड. घरत यांनी केली. मात्र, न्यायालयाने सदावर्ते यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, सदावर्ते यांनी जामिनासाठी मुंबईतील सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
सदावर्ते यांच्या घरातून नोटा मोजण्याची मशीन आणि बरीच कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत असेही अॅड. घरत यांनी यावेळी सांगितले. अॅड. सदावर्तें यांच्याबाजूने एकही वकील न्यायालयात हजर झाला नाही. अखेर सदावर्ते यांनीच आपल्या बचावात स्वत: युक्तिवाद करत सरकारी पक्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले. एसटी कामगारांकडून न्यायालयीन कामकाजासाठी लागणारा खर्च म्हणून प्रत्येकी 300 ते 500 रुपये एवढे होते.
एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगावे, असे ते म्हणाले. पोलीस हा एक मोठा स्कॅम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे ही वकालतनाम्यासंबंधी आहेत. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला हे दुःखद असल्याचे अॅड. सदावर्ते यांनी न्यायालयाला सांगितले.
घरी पैसे मोजायची मशिन सापडणे हा गुन्हा होऊ शकत नाही. ती मशिन आपण अवघ्या तीन हजार रुपयांत विकत घेतल्याचे अॅड. सदावर्ते यांनी न्यायालयात स्पष्ट केले. ज्या गाडीचा उल्लेख सरकारी वकिलांनी केला आहे, ती आपण 2014 सालची सेकंडहँड विकत घेतली आहे. गाडीचे ऑनलाईन पैसे भरून रीतसर आरटीओत नोंदणी केल्याचीही माहिती त्यांनी न्यायालयाला दिली.
सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणात अटक करण्यात आलेल्या 115 कामगारांच्या जामीन अर्जावरही एकत्रित सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे. या अर्जावर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारने वेळ मागून घेतला आहे.
सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे
मुंबईत दाखल झालेल्या कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मागणारा एक अर्ज न्यायालयात सादर केला. यावेळी अकोला पोलीससुद्धा अकोट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अॅड. सदावर्ते यांचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात पोहोचले होते. मात्र न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना अॅड. सदावर्ते यांचा ताबा घेण्याची परवानगी दिली.
अकोटच्या कर्मचार्यांचे पैसे सदावर्ते परत करणार
एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी अॅड. जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी अकोट न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अकोट आगारातील एस.टी. कर्मचार्यांकडून घेतलेले पैसे परत करण्यास सदावर्ते तयार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.