अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे नोटा मोजण्याचे मशीन | पुढारी

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे नोटा मोजण्याचे मशीन

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांकडून जमवलेल्या पैशातून लाखो रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे गिरगाव न्यायालयात सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मागणी मंगळवारी केली.

सदावर्ते यांनी एसटी कामगारांकडून मिळालेल्या पैशातून भायखळा आणि परळ परिसरात मालमत्ता खरेदी केल्या असाव्यात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यात परळमध्ये 60 लाखांची एक जागा खरेदी करण्यात आली. भायखळ्यातील मालमत्ता भायखळा स्टेशनसमोरच असून, या संदर्भातील कागदपत्रांवर सदावर्ते कुटुंबातील सर्वांचा उल्लेख आहे. सदावर्ते यांनी एसटी कामगारांकडून पैसे जमा केले व त्यांचा विनियोग कसा केला हे तपासण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे अ‍ॅड. घरत म्हणाले.

ओएलएक्सवर जाहिरात पाहून अ‍ॅड. सदावर्ते यांनी मोहम्मद रफी नावाच्या केरळातील माणसाशी संपर्क केला. 16 मार्च रोजी 23 लाख रुपये त्याच्या नावावर ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि आठवड्याभरातच ही कार खरेदी केली. सदावर्ते यांच्या घरी सापडलेल्या डायरीत काही संशयास्पद नोंदी आहेत. त्यांची आम्ही पडताळणी करत आहोत. 35 पेपर त्यांच्या घरातून जप्त केले आहेत, असे सांगून अ‍ॅड. घरत म्हणाले, सदावर्ते यांच्या घरातून पैसे मोजण्याची मशीनदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. या मशीनवर 85 लाख रुपये मोजले गेले आहेत. त्याचा आम्हाला तपास करणे गरजेचे असल्याने आम्हाला कोठडी मिळावी अशी मागणी अ‍ॅड. घरत यांनी न्यायालयात केली.

सदावर्ते यांनी प्रतिज्ञापत्राच्या नावाखाली एक अर्ज बनवला होता. त्याचे 250 रुपये आणि तिकीट फी 50 रुपये असे पैसे प्रत्येक एसटी कामगाराकडून घेतले. सदावर्तेंकडे सापडलेल्या एका हिरव्या रजिस्ट्ररमध्ये 250 डेपोंतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख आहे. आपण वकील असून 20 वर्षे वकिली करत असल्याचे सदावर्ते यांचे म्हणणे आहे.

मात्र त्यांनी नुकतीच काही मालमत्ता आणि कार खरेदी केली. हे संशयास्पद आहे. याचा अधिक तपास करायचा आहे, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. त्यावर न्यायालयाने सदावर्ते यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गावदेवी पोलीस अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यांचाही शोध घेत आहेत.

कोल्हापूरचे पोलीस मुंबईत

कोल्हापूर : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. यासाठी मंगळवारी दिवसभर मुंबईत न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. त्यांचा लवकरच ताबा मिळू शकेल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सदावर्ते यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 21 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. फिर्यादी दिलीप पाटील यांच्यामार्फत न्यायालयीन कामकाजात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ वकील शिवाजीराव राणे यांनी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यासही मंजुरी दिली.

अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरुद्ध मराठा सकल मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध केला आहे. चिथावणीखोर वक्तव्ये करून समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण केले आहे. त्यामुळे सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button