मुंबई; पुढारी ऑनलाईन : पाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारविरोधात भोंगा लावताच राजकीय धुळवड सुरु झाली आहे. मशिदीवरचे भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तीन मे पर्यंत भोंगे काढले नाही, तर पाचवेळा हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे सरकार गॅसवर आहे.
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी सर्व धर्मियांसाठी भोंगे लावण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्याची घोषणा केली आहे. येत्या एक-दोन दिवसात पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे एकत्र चर्चा करून नियमावली निश्चित करतील असे वळसे – पाटील यांनी सांगितले.
या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना आता धमक्या मिळू लागल्या आहेत. पीएफआयसारख्या संघटनांकडून राज ठाकरेंना मिळालेल्या धमक्या पाहता मोदी सरकार राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. राज ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्यात योगी सरकारकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे समजते.
राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत सभा घेण्याचे रविवारी पुणे येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. ठाकरे यांनी ही घोषणा करताच सर्वांचेच लक्ष या ऐतिहासिक शहराकडे लागले आहे. ठाकरे यांनी सभेसाठी औरंगाबाद निवडणं, यामागील 'राज'नितीची अनेक कारणे असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे, हिंदुत्वावरील पकड अधिक घट्ट करण्यासाठी राज ठाकरे हे नियोजनबद्ध व हळुवाररित्या दिवंगत हिंदुह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाऊलावर पाऊल टाकत असल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांच्या रुपातच आता राज ठाकरे झळकत आहेत. 'गर्व से कहो हम हिंदू है, या घोषणाही मनसेने हिरावली आहे.
बाळासाहेबांचे मुंबई, ठाणेनंतर औरंगाबादवर विशेष प्रेम होते. राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडवा सभा, त्यानंतर ठाण्यात उत्तर सभा घेतली आणि आता महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी औरंगाबादेत सभा घेण्याचे जाहीर केले आहे. ही सभा त्याच सांस्कृतिक मैदानावर होणार आहे, जिथे बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये सभा घेत 'औरंगाबाद'चे नाव 'संभाजीनगर' करण्याची घोषणा केली होती. 2005 मध्ये याच मैदानावर शिवसेनाप्रमुखांची सभा सुरु असताना अजान झाली. त्यावेळी बाळासाहेबांनी अजानला जोरदार विरोध दर्शविला होता. आता मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत शासनाला 3 तारखेची डेडलाईन दिली आहे.
तत्पुर्वीच 1 तारखेला राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेण्याचे जाहीर केल्याने आतापासूनच 'राज'कारण चांगलेच तापले आहे. या सभेत 'ते' काय गर्जतील, हे त्यावेळीच कळेल. परंतु एकूण ठाकरे यांच्या याही सभेसाठी तुफान गर्दी होईल, हे मात्र निश्चित.
राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेण्याचे जाहीर करताच येथील मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. ठाणे येथील उत्तर सभेत आलेल्या आडकाठ्या टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी रविवारीच सभेसाठी सांस्कृतिक मंडळ मैदान बुक केल्याचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर म्हणाले.
हनुमान जयंतीनिमित्ताने शनिवारी शहरात मनसैनिकांनी सामुहिक हनुमान चालिसा पठण केले. जिल्ह्यात मनसेची मोठी ताकद असल्यानेच पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी सभेसाठी औरंगाबादची निवड केल्याचे महानगर अध्यक्ष बिपीन नाईक म्हणाले.
हे ही वाचलं का ?