गुणरत्न सदावर्ते यांनी एक फॉर्म तयार केला आणि एसटीच्या २५० डेपोंमधून ‘गल्ला’ जमवला !

गुणरत्न सदावर्ते यांनी एक फॉर्म तयार केला आणि एसटीच्या २५० डेपोंमधून ‘गल्ला’ जमवला !
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीच कर्मचार्‍यांकडून पैसे जमा केले. त्यांनी एक फॉर्म तयार केला आणि 250 डेपोंमधून पैसे जमा केले, अशी धक्कादायक माहिती सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी शनिवारी न्यायालयात दिली. परिणामी, सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणात गावदेवी पोलिसांनी अजित मगर नावाच्या आणखी एका आरोपीला अटक केली असून, अटक आरोपींची आकडा 117 झाली आहे. पोलिसांनी शनिवारी मगरसह यापूर्वी अटक केलेल्या पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी, अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले. या सर्वांना न्यायालयाने 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मगर याने हल्ल्याच्या कटात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. गोडबोले हा खास हल्ल्यासाठी नागपूरहून मुंबईत आला होता. तो 7 एप्रिलच्या बैठकीला हजर होता. त्याच्यासोबत अन्य काही व्यक्तींसह वॉन्टेड असलेल्या जयश्री पाटीलदेखील बैठकीत उपस्थित होत्या, अशी माहिती वकिलांनी न्यायालयाला दिली.

आपणास काय सांगायचे आहे काय, असे न्यायालयाने विचारताच आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले की, कर्मचार्‍यांकडून मी पैसे घेतले नाही. मात्र सदावर्ते यांनी अर्ज तयार केले आणि पैसे गोळा करायला लावले. सदावर्ते आणि गोडबोले यात सहभागी आहेत, असे पाटील याने सांगितले. पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी यानेदेखील आम्ही काही केले नाही. सर्व काही सदावर्ते यांनी केले, असे न्यायालयाला सांगितल्याने सदावर्ते यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे करण्यात आलेल्या दाव्यानुसार, अ‍ॅफिडेव्हिट फाईल करायचे असल्याचे सांगून 270 रुपये कर्मचार्‍यांकडून उकळण्यात आले. पैसा उकळण्यासाठी सदावर्ते यांच्याकडून एक फॉर्म तयार करण्यात आला होता. पुढे हा फॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवण्यात आला. त्यानंतर एकूण 250 डेपोतून पैसे गोळा करण्यात आले. मात्र कर्मचार्‍यांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांतून सदावर्ते यांनी काही मालमत्ता आणि कार खरेदी केल्याचा संशय आहे. हा तपास करण्यासाठी सदावर्ते यांचीदेखील कोठडी आम्हाला लागेल यात शंका नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

सदावर्ते यांची बाजू

पैसे गोळा केले म्हणजे खंडणी मागितली नव्हती. हा आरोप चुकीचा आहे. पैसे गोळा केले आणि ते खर्च केले किंवा नाही त्याचा अजूनही पत्ता नाही. सर्व जण तब्बल पाच महिने मैदानावर राहिले होते. पैशांसंदर्भात काही करार झाला नव्हता. समजा हा पैसा फीसाठी घेतला. तर फीबद्दल विचारण्यात आले नव्हते. त्यामुळे पैसा दाखवला नाही, असे म्हणणे चुकीचे आहे.

गुन्ह्यात दाखल करण्यात आलेली 403 आणि 406 कलमे यात लागूच होत नाही. कोणाचीही फसवणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणता पैसा, कुठे गेला, कसा गेला यासंबंधी चौकशी करायचा प्रश्न येतोच कुठे. माझ्या अशिलाने मला पैसे मला दिले त्याची चौकशी करणे चुकीचे आहे. 80 लाख गोळा केले असे म्हणत असतील ती माझी फी होती, असा दावा यावेळी सदावर्ते यांच्या बाजूने यावेळी करण्यात आला.

जयश्री पाटील कुठे आहेत?

गावदेवी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा शोध सुरू केला आहे. मुलांना नातेवाइकांकडे ठेवून फोन बंद करत बुधवारपासून अ‍ॅड. जयश्री पाटील या नॉट रिचेबल झाल्या आहेत. अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणातील गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्यांना पाहिजे आरोपी दाखविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news