राज्यात उष्माघाताने ७ जणांचा मृत्यू, १२१ रुग्णांवर उपचार | पुढारी

राज्यात उष्माघाताने ७ जणांचा मृत्यू, १२१ रुग्णांवर उपचार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात विदर्भात अद्यापही पारा चढाच आहे. असह्य उकाडा आणि उन्हाचा तडाखा यामुळे आतापर्यंत राज्यभरात 7 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर सध्याच्या घडीला उष्माघाताचे 121 रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, विदर्भात अद्याप पारा चढाच आहे. राज्यात चंद्रपुर येथे सर्वाधिक 43.2 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.

राज्यात अनेक भागांत पारा चाळीशीपारच आहे. उष्णआणिकोरड्या वार्‍यांच्या प्रभावामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने वाढत आहे. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, आतापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये औरंगाबाद, नाशिक, लातूर, अकोला याठिाकणी प्रत्येकी 1 मृत्यू झाला तर नागपूरमध्ये 2 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला.

याशिवाय उष्माघाताच्या 14 संशयित मृत्यूपैकी औरंगाबादमध्ये 4 , लातूरमध्ये 1, नाशिकमध्ये 3,अकोल्यात 2 आणि नागपूरमध्ये 4 मृत्यू आहेत. दरम्यान, उष्माघातावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण, जनजागृती, उपचारपद्धतीचे शिक्षण असे उपक्रम राबविले जातात.

उष्माघाताचे रुग्ण

नागपूर विभाग  78
अकोला विभाग 17
नाशिक विभाग  09
औरंगाबाद        04
लातूर विभाग     01
पुणे विभाग       12
संशयित उष्माघात मृत्यू 14
जळगाव         03
नागपूर           04
जालना           02
अकोला, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली उस्मानाबाद प्रत्येकी 1

मुंबईत 35, ठाण्यात 42 अंश

मुलुंडमध्ये 38, विक्रोळीत 37 तर बोरिवली आणि सांताक्रूझमध्ये 35 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यात आर्द्रताही 87 टक्क्यांवर गेल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले. तर ठाण्याचा पाराही तब्बल 42 अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे उन्हाचे अक्षरशः चटके बसत होते.

Back to top button