मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गोरेगाव येथील पत्रा चाळ घोटाळ्यात त्यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सोमय्या यांनी सांगितले की, खा. राऊत यांनी 8 महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे 55 लाख रुपये भरून आपल्या गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. आपल्यावर कारवाई होणार या भीतीने हबकलेल्या राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांवर आरोप करणे सुरू केले होते. त्यांनी माझ्या कुटुंबीयांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या. राज्यसभा अध्यक्षांना पत्र पाठवून ईडीच्या अधिकार्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र या दबावाला न जुमानता ईडी अधिकार्यांनी राऊत यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.
राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे 55 लाख रुपये भरले तेव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना जाब विचारायला हवा होता. मात्र तसे न करता ठाकरे सरकारने पोलिसांवर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला. मला आणि माझ्या मुलाला जेलमध्ये टाकायला निघाले.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना वाटले की, पोलिसांचा माफियाप्रमाणे वापर करून ईडी, सीबीआय आणि आयकर अधिकार्यांवर आपण दबाव आणू. मात्र संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. एक हजार 38 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा प्रवीण राऊत मुख्य आरोपी आहे. त्यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे गेले आहेत. त्या पैशातून अलिबागला जमीन आणि दादरला फ्लॅट खरेदी करण्यात आला. कारवाईच्या भीतीने संजय राऊत यांनी 55 लाख परत केले, असे किरीट सोमय्या म्हणाले.
सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर: राष्ट्रवादी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांच्या मालमत्तावांवर छापे टाकून सरकारबद्दल संशय निर्माण करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते. मात्र, राऊत यांच्यावर दबाव आणण्यासाठी ईडीने अशा प्रकारची कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केंद्रीय यंत्रणांच्या वापरावर आपले मत नोंदवले आहे. यावरून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर व्हायला लागलेला आहे, असे स्पष्ट होते.
देशात लोकशाही राहिली आहे का? : आदित्य ठाकरे
मुंबई : खासदार संजय राऊत यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. आज देशात आणि राज्यात जे काही सुरू आहे ते पाहता आता या देशात लोकशाही राहिली आहे का, असा सवाल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी उपस्थित केला. ते म्हणाले, खा. राऊत यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने झाली आहे. हे दबावशाहीचे वातावरण आहे. शिवसेना भाजपसोबत गेली नाही. त्यामुळे या कारवाया सुरू आहेत, असा आरोप वारंवार करण्यात येत आहे. भाजप नेते आधी कारवाईची माहिती देतात आणि मग कारवाई होते. खुलेआम धमक्या देऊन विरोधकांना संपविण्यासाठी यंत्रणांचा वापर केला जात आहे.