नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पर्याय निर्माण होऊ शकत नाही, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केले.
शरद पवार खूप मोठे नेते आहेत. सगळेच त्यांचा आदर करतात, सन्मान करतात. देशातल्या विरोधी पक्षाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. विरोधी, समविचारी पक्ष एकत्र यावेत यासाठी नक्कीच काही भूमिका ठरवत आहेत. अशात शरद पवार यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही, हे सर्वांना माहिती आहे, असेदेखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
पवारांचे मार्गदर्शन याबाबतीत नेहमी लाभत असते. त्यांच्या मनात काय आहे, हे आम्ही समजून घेऊ. शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय किंवा विरोधी पक्षाची एकजूट होऊ शकत नाही. विरोधकांच्या एकजुटीचे नेतृत्व करण्यासाठी देशात अनेक सक्षम प्रमुख नेते आहेत. परंतु, या आघाडीचे नेतृत्व करण्यात शरद पवारांनी पुढे यावे, असे सर्वांना वाटत असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.
सर्वत्रच ईडीची चौकशी लावा : राऊत
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जर पैसे घेऊन मतदान केले तर मतदारांच्या मागे ईडी लागेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, कोल्हापूर उत्तरच कशाला, गोव्यात पणजी आणि साखळी मतदारसंघातील मतदारांच्या मागे ईडी लावा. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या काही मतदारसंघांत ईडी लावणे गरजेचे आहे. उत्पल पर्रिकरांचा पराभव झाला. साखळी मतदारसंघात ईडी चौकशी लावली तर त्याचे स्वागत करू. महाराष्ट्राचे नंतर बघू. परंतु सुरुवात या पाच राज्यांत करा. मतदारांवर अनेक माध्यमांतून टाकण्यात आलेला दबाव याची चौकशी होणे गरजेचे आहे.