

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : 'मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही आमच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमांना येत नाही. म्हणून मतभेदांच्या बातम्या येतात', असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. तो साभार परत करत मुख्यमंत्र्यांनीही आपले टोमणे अस्त्र सोडले. ठाकरे म्हणाले, 'तुम्ही जेथे आहात तेथे मी येण्याची गरज नाही.'
वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पार पडले. गेले दोन दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये 'गृह'कलह सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत.
भाजप नेत्यांवर कारवाई होत नाही म्हणून सेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर थेट हल्ला चढवला. त्यानंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी वळसे-पाटील आणि राऊत यांची संयुक्त बैठक घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला. त्याच्या दुसर्याच दिवशी अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही जीएसटी भवनाच्या भूमिपूजनासाठी एकत्र आले. अर्थात मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित होते आणि उपमुख्यमंत्री ऑफलाईन.
मुख्यमंत्र्यांना उद्देश्ाून अजित पवार म्हणाले, तुम्ही आज मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहिलात. पण माझ्या खात्याच्या वस्तू व सेवाकर भवनाच्या या भूमिपूजनाला प्रत्यक्ष उपस्थित राहिला नाहीत. त्यामुळे वेगळा अर्थ काढला जातो, अशी मिश्कील टिप्पणीही उपमुख्यमंत्र्यांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांच्या या टोलेबाजीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमके उत्तर दिले. ते म्हणाले, अजितदादा, तुम्ही जेथे आहात तेथे मी येण्याची गरज नाही.