मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. केंदीय तपास यंत्रणांच्या राज्यातील कारवायांबाबत दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला वरीष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थितीत आहेत, असे समजते आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष पराकोटीला जाऊन पोहोचला आहे. भाजप नेत्यांनी तक्रारी केल्यानंतर काही दिवसांमध्येच ईडीकडून धाडी सुरु असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री संतप्त भावना व्यक्त करत आहेत. तुलनेत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या गृह खात्याकडून भाजप नेत्यांच्या बाबतीत घेतलेल्या मवाळ भूमिकेवरून शिवसेनेनं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
गृहखात्याला आता ठोस भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. गृहखात्याकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याने नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
ईडीचा ससेमीरा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकील तसेच देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका दाखल करणारे ॲड. सतीश उके यांच्यावरही ईडी कारवाई झाली आहे. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख अटकेत आहेत. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक आणि अनिल परब यांच्यावरबही भाजपकडून आरोप होत आहेत. मुंबई मनपातील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरही ईडीची कारवाई झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी गृह खातं स्वत:कडे ठेवले होते. याच धर्तीवर शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे या खात्याची जबाबदारी आपल्याकडे मागितल्याचे समजते. ईडीच्या दे दणादण कारवाईनंतर प्रत्युत्तर म्हणून संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात पुरावे सादर करत कारवाईची मागणी केली होती. मात्र, पत्यक्षात कोणतीच कारवाई न झाल्याने सेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रवीण दरेकरांविरोधात हीच भावना सेनेची आहे.
त्यामुळे आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार, आणि त्यानंतर कोणती भूमिका घेतली जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, शिवसेना संजय राऊत यांनी भाजपवर या मुद्यावरून जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याच राज्य आहे. भाजप महाराष्ट्रात अतिरेक्यांप्रमाणे कारवाया करत आहे. याकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने ज्यांच्या कॉलरला हात घालायचा आहे तो घालणारचं, असे मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत बोते.
महाराष्ट्रात ठाकरे सरकार कायद्याने चालत आहे. अशावेळी भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. राज्यातील काही कारवायांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही लक्ष आहे. भाजपला जशाच तसे उत्तर द्यायला हवं. मुख्यमंत्री नाराज असल्याची अफवा विरोधकांनी पसरवली. भाजपला यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये उत्तम संवाद आहे. मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र भाजपकडून मुख्यमंत्री नाराज असल्याची अफवा पसरवली जात आहे. त्यामध्ये तथ्य नाही, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पदासाठीच भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांच सरकार आहे. तीन्ही पक्ष आपल्या-आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत आहेत. केंद्राच्या कोणत्याही दबावापुढे आम्ही झुकणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.