निवडणुकीआधीच महाराष्ट्रात पंधरा नवीन पक्षांची भर

निवडणुकीआधीच महाराष्ट्रात पंधरा नवीन पक्षांची भर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, याबाबत कोणालाही शाश्वती नाही. मात्र, निवडणूक लढण्यासाठी पंधरा नवीन राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. त्यामध्ये पुणे, नाशिक आणि जळगावमधील नवीन पक्षांचा समावेश आहे.

जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र जनविकास आघाडी अखिल भारतीय बंजारा सेना (जळगाव) प्रजासत्ताक समाजवादी पार्टी, जन सामान्य पार्टी (पुणे), नाशिक जिल्हा लोकविकास आघाडी, पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यासह १५ नवीन राजकीय पक्षांची नोंदणी केली आहे.

महाराष्ट्रात राजकीय पक्षांची नोंदणी करण्याची पद्धत सहज आणि सोपी असल्याची माहिती निवडणूक आयोगातील एका अधिकाऱ्याने दिली. नोंदणी करण्यात येणाऱ्या पक्षाकडे १५० सदस्य, प्रस्तावित पक्षाची घटना असल्यास निवडणूक आयोगाच्या नावाने १० हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडून अर्ज केला जातो. अर्जासोबतच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर आयोगाकडून अधिसूचना जारी केली जाते. त्यावर एक महिन्याच्या आत कोणाच्या हरकती आल्या नसल्यास पक्षाची नोंदणी केली जाते. नोंदणीकृत पक्षांना प्रत्येक वर्षातून दोनवेळा ऑडिट आणि आपली माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. ती न केल्यास पक्षाची नोंदणी रद्द होते. २०१६ मध्ये २२० स्थानिक पक्षांची नोंदणी रद्द केली होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news