सीएनजी व पीएनजी स्वस्त | पुढारी

सीएनजी व पीएनजी स्वस्त

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये राज्य शासनाने 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कपात केल्याने सीएनजी व पीएनजी दरात अनुक्रमे 6 व 3.50 रुपयांची कपात करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने घेतला आहे.

आता मुंबई महानगरात प्रतिकिलो 66 रुपयांवर असलेला सीएनजी थेट 60 रुपयांपर्यंत, तर 39.50 रुपये प्रति एससीएम असलेला पीएनजी 36 रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होतील.नव्या दरांमुळे सीएनजी पेट्रोलच्या तुलनेत 65 टक्के, तर डिझेलच्या तुलनेत 41 टक्के स्वस्त असल्याचा दावा महानगरने केला. घरगुती वापराच्या एलपीजीच्या तुलनेत पीएनजी हा 32 टक्के किफायतशीर आहे.

पेट्रोल, डिझेलची महागाई सुरूच!

नवी दिल्ली : गुरुवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ केली. गेल्या 10 दिवसांत इंधन दरात झालेली ही नववी वाढ आहे. या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे एकूण दर 6.40 रुपयांनी वधारले आहेत. मुंबई, औरंगाबाद आणि अमरावतीपाठोपाठ कोल्हापुरातही डिझेलने शतक पार केले.

ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 101.81 रुपयांवर गेले असून, डिझेलचे दर 92.27 रुपयांवरून 93.07 रुपयांवर गेले आहेत. सुमारे साडेचार महिने दर स्थिर ठेवल्यानंतर 22 मार्च रोजी सर्वप्रथम तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. मुंबईमध्ये पेट्रोल 116.72, तर डिझेल 100.94 रुपयांवर गेले आहे. चेन्नईत हेच दर क्रमश: 107.45 आणि 97.52 रुपयांवर गेले आहेत, तर कोलकाता येथे क्रमशः 111.35 व 96.22 रुपयांवर गेले आहेत.

कोल्हापुरात डिझेलचे शतक

टप्प्याटप्प्याने काही पैशांची वाढ करत डिझेल दराने प्रथमच शंभरी गाठली. गुरुवारी पेट्रोल दरात 86, तर डिझेल दरात 83 पैशांची वाढ झाली. त्यामुळे कोल्हापुरात पेट्रोल प्रतिलिटर 116 रुपये 52 पैसे, तर डिझेल 99 रुपये 28 पैसे झाले आहे. दहा दिवसांत पेट्रोल, डिझेल दरात 6 रुपयांची वाढ झाली आहे.

Back to top button