मालाड : संरक्षक भिंत न दिसल्याने दुचाकीसह तरुण नाल्यात कोसळला
मालाड, पुढारी वृत्तसेवा : काळोखात नाल्याची संरक्षक भिंत न दिसल्याने दुचाकीसह तरुण नाल्यात पडला. सुदैवाने तो सुखरूप असून रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या पादचाऱ्यांनी त्याला नाल्यातून बाहेर काढले. ही घटना मालवणीतील गेट क्रमांक ६ येथील नाल्यालगतच्या नवीन रस्त्यावर शुक्रवारी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
या ठिकाणी याआधीही अशाच घटना घडल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासनाला येथे भिंत बांधण्याची सुबुद्धी आलेली नाही. तसेच काही कारणास्तव या ठिकाणी भिंत बांधली नसेल, तर किमान लोखंडी बॅरिकेड आणि सूचना फलक लावणे येथे आवश्यक आहे.
नाल्यालगत शहीद अब्दुल हमीद रस्त्यावर असलेल्या पुलाची भिंत संपूर्णपणे तुटलेली आहे. तेथून मालवणीत हजारो वाहने दिवसभरात ये – जा करतात. तसेच या नाल्यालगत काँग्रेस नगरसेविका कमर्जहा सिद्दीकी यांचे कार्यालय आहे. गेली अनेक वर्षांपासून येथील भिंत तुटली आहे. त्यामुळे येथे अपघाताच्या घटना घडत आहेत. तरी या ठिकाणी तातडीने संरक्षक भिंत बांधण्याची मागणी नागरिकांतून आणि वाहनधारकांतून होऊ लागली आहे.
हेही वाचलंत का ?

