मुंबई विकासनिधीत कपात

मुंबई विकासनिधीत कपात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा वाढता खर्च आणि घटलेले उत्पन्न शिवाय येऊ घातलेली तिसरी लाट विचारात घेऊन मुंबईच्या विकासनिधीत मोठी कपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

कोरोना संकटातही 2021-22 या आर्थिक वर्षात विकासकामांसाठी तब्बल 18 हजार 750 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद महापालिकेने केली. आता याच तरतुदीला हात घालत विकासकामांच्या निधीमध्ये सुमारे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची कपात होऊ घातली आहे.

या कपातीमुळे चालू प्रकल्पांवर कोणताही परिणाम होणार नाही किंवा कोणताही प्रकल्प निधीअभावी रखडणार नाही, असा खुलासा पालिकेच्या सूत्रांनी केला असला तरी या कपातीचा थेट फटका रस्ते, शाळादुरुस्ती, पाणीपुरवठा प्रकल्प व अन्य प्रकल्पांना बसणार आहे.
कोरोनावर आतापर्यंत सुमारे दोन हजार कोटींहून जास्त खर्च झाला आहे. कोरोना निर्बंधांमुळे विकासकामांचा वेग मंदावला.

परिणामी अनेक चालू प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के वापरणे शक्य नाही. त्यामुळे 2020-21 वर्षाप्रमाणे 2021-22 या आर्थिक वर्षातही विकासकामांच्या निधीमध्ये कपात करण्याचा विचार पालिकेने चालवला आहे.

या कपातीमुळे अंतर्गत निधी व राखीव निधीतून कमी पैसा काढावा लागेल. 2021-22 आर्थिक वर्षामध्ये अंतर्गत निधीतून सुमारे 12 हजार कोटी रुपये काढण्यात येणार होते. पण विकासकामांच्या निधीत कपात केल्यामुळे आता ही प्रचंड रक्‍कम काढण्याची गरज भासणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

* शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 244 कोटी रुपयांची तरतूद होती. त्यात 150 कोटी रुपयांची कपात केली जाणार आहे.

* गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या 1 हजार 300 कोटी रुपयांपैकी 20 ते 25 टक्के निधीची कपात करण्यात येणार आहे.

* सांडपाणी प्रक्रिया केंद्र व मुंबई मलनि:सारण प्रकल्पासाठी 1 हजार 339 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असली तरी या निधीलाही कात्री लागू शकते.

* रस्ते, पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका मालमत्तांच्या दुरुस्त्या व अन्य प्रकल्पांच्या निधीमध्येही 20 ते 25 टक्के कपात करण्यात येणार असल्याचे समजते.

* नगरसेवकांसाठी देण्यात येणार्‍या विकास निधीमध्येही कपात अटळ आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news