मुंबई : चाळकरी मुलांची लग्न ठरेनात…

मुंबई : चाळकरी मुलांची लग्न ठरेनात…
Published on
Updated on

मुंबई ; राजेश सावंत : गिरगावसह दक्षिण मुंबई तील चाळींमधील सदनिकांमध्ये शौचालय बांधण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. मात्र घर मालकाकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी होत असल्यामुळे काही रहिवाशांना शौचालय बांधणे शक्य होत नाही.

त्यामुळे चाळीतील अनेक मुलांची लग्नच ठरत नाहीत. मुली चाळीत राहण्यास तयार असतात, मात्र स्वतंत्र शौचालय नसल्यामुळे त्याही लग्नाला स्पष्ट नकार देत आहेत.

गिरगाव, चिरा बाजार, चंदनवाडी व दक्षिण मुंबईतील अन्य भागात असलेल्या चाळींमध्ये सार्वजनिक शौचालय आहेत. मुंबई महानगरपालिकेने पाच वर्षांपूर्वी चाळींमधील सदनिकांमध्ये शौचालय बांधण्यास परवानगी दिली आहे. मात्र यासाठी चाळ मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मालक व रहिवाशांमध्ये असलेले वाद, एवढेच नाही तर, काही मालकांकडून पैशाची मागणी होत असल्यामुळे रहिवाशांना ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही.

त्यामुळेच चाळकर्‍यांना आजही सार्वजनिक शौचालयचा वापर करावा लागत आहे. पण यामुळे चाळीत राहणार्‍या मुलांची लग्नच ठरत नसल्याचे सत्य समोर आले आहे.

चाळीत राहणार्‍या मुलीही चाळीतील मुलाशी लग्न करायला तयार होत नाही. त्यामुळे अनेक मराठी कुटुंबियांना नाईलाजाने चाळीतील घर विकून बदलापूर, अंबरनाथ अथवा वसई-विरारला मोठे घर खरेदी करावे लागत आहे.

दक्षिण मुंबईत राहायला मिळते म्हणून मुली चाळीत राहण्यास तयार असतात, पण स्वतंत्र शौचालयाची अट घालण्यात येते. हा तिढा सोडवण्यासाठी आता चाळकर्‍यांनी चाळ मालकाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा आग्रह धरला आहे.

गिरगाव येथील ज्येष्ठ नागरिक शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी ही अट शिथिल करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पूर्वी चाळींमध्ये स्वतंत्र पाण्याची जोडणी घ्यायची असेल तर, चाळ मालकाचे नाव ना हरकत प्रमाणपत्र लागत होते. मात्र ही अट कालांतराने शिथिल करून, पालिका उपायुक्तांना अधिकार देण्यात आला. आता उपायुक्तांना असलेला अधिकार काढून, चाळकर्‍यांनी जलजोडणीसाठी अर्ज केल्यास त्यांना तातडीने जलवाहिनी देण्यात येते.

याच धर्तीवर शौचालय बांधण्यासाठी चाळ मालकांच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट शिथिल करून, ज्या रहिवाशाला शौचालय हवे असेल, त्याला शौचालय बांधण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी शुल्क भरण्यासही चाळकरी तयार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

डॉक्टर असूनही शौचालय नसल्यामुळे मुलींचा नकार !

माझा मुलगा डॉक्टर आहे. त्याचे लग्नाचे वय झाल्यामुळे आम्ही स्थळ बघण्यास सुरुवात केली. मुलींनी त्याला पसंतही केले. पण जेव्हा मुलीकडील मंडळी गिरगावमधील चाळीतील घरांमध्ये आले. तेव्हा त्यांनी घरांमध्ये स्वतंत्र शौचालय आहे का, अशी विचारणा केली. यावर आम्ही नाही असे उत्तर देताच, त्यांनी लग्नाला नकार दिला.
– रोहिदास वर्पे, गिरगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news