कोरोना चा विमानतळाला फटका | पुढारी

कोरोना चा विमानतळाला फटका

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना च्या दुसर्‍या लाटेचा मुंबई विमानतळाला मोठा फटका बसला आहे. मार्चच्या तुलनेत मे महिन्यात मुंबई विमानतळावरील उड्डाण संख्येत तब्बल 58 टक्के घट झाली असून, या काळात केवळ 7 हजार विमानांचे उड्डाण झाले. सर्वात व्यस्त विमानतळ अशी ओळख असलेल्या मुंबई विमानतळावरून कोरोनापूर्वकाळात दररोज सरासरी 980 विमानांचे उड्डाण व्हायचे.

मात्र, कोरोना मुळे प्रवासी घटल्याने उड्डाणांची संख्या घटली आहे. जानेवारी महिन्यात 16 हजार 431, फेब्रुवारीत 15 हजार 689, तर मार्चमध्ये मुंबईहून तब्बल 17 हजार 46 विमानांनी उड्डाण घेतले.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अहवालानुसार, मुंबई विमानतळावर एप्रिल महिन्यात 13 हजार 763, तर मे महिन्यात सर्वात कमी 7 हजार 147 उड्डाणे झाली.

देशभरातील विमानतळांचा विचार करता मार्चमध्ये 1 लाख 68 हजार 472, एप्रिलमध्ये 1 लाख 43 हजार 984 आणि मेमध्ये केवळ 74 हजार 727 विमाने आकाशात झेपावली. नागरी उड्डाण संचालनालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध 31 जुलैपर्यंत वाढविले आहेत.

त्याशिवाय युरोपियन राष्ट्रे, संयुक्‍त अरब अमिरातीसह काही महत्त्वाच्या देशांनी भारतीय प्रवाशांवरील निर्बंध अद्याप शिथिल केले नसल्याने मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या तीन हजारांच्या वर गेलेली नाही.

Back to top button