मुंबई : मेट्रो स्टेशनसह 24 मालमत्ता पालिकेकडून जप्त

मुंबई : मेट्रो स्टेशनसह 24 मालमत्ता पालिकेकडून जप्त
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई मेट्रो वनने तब्बल 300 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवल्यामुळे मुंबई महापालिकेने मेट्रोच्या आझाद नगर, वर्सोवा आणि डीएन नगर स्टेशनसह 24 मालमत्ता सील केल्या आहेत. मार्चअखेरपर्यंत कर न भरल्यास पाणीपुरवठा खंडितच नाही तर, वेळ पडल्यास मालमत्ता लिलाव करण्याचा इशाराही महापालिकेच्या अंधेरी के पश्चिम व के पूर्व विभागाने मेट्रो वनला दिला आहे.

मालमत्ता कर कोणी भरावा, यावरून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडी) आणि मुंबई मेट्रो वन यांच्यात वाद आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मालमत्ता कर भरण्यात आलेला नाही. मेट्रोचा बहुतांश मार्ग अंधेरी के पश्चिम व अंधेरी के पूर्व विभागातून जातो. मेट्रो वनने गेल्या अनेक वर्षापासून मालमत्ता कर न भरल्यामुळे अंधेरी के पश्चिम विभागाने 220 कोटी रुपये कर वसूल करण्याची नोटीस बजावली आहे. तर अंधेरी के पूर्व विभागाने 80 कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीची नोटीस बजावली आहे.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर दरम्यान 11.5 किमीचा मेट्रो मार्ग आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर बांधलेला हा मुंबईतील पहिला मेट्रो मार्ग आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या आर इन्फ्राचा मेट्रो वनमध्ये 74 टक्के हिस्सा तर एमएमआरडीए 26 टक्के मालकी आहे.

मालमत्ता कर 300 कोटी रुपयांपर्यंत थकीत असल्यामुळे तो वसूल होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई मेट्रो वनला नियमानुसार नोटीस बजावण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार स्टेशनसह यार्ड, कारशेड, स्टोअर बिल्डिंग, वर्कशॉप आणि इलेक्ट्रिक सबस्टेशन या जप्त करण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण विभागाकडून सांगण्यात आले.

मेट्रो वनने एमएमआरडीने कर भरला पाहिजे, असे पालिकेच्या करनिर्धारण विभागाला कळवले होते. मात्र, यावर चर्चा होऊन मालमत्ता कर मेट्रो वननेच भरला पाहिजे, असे करनिर्धारण विभागाकडून मेट्रो वनला कळविण्यात आल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news